शिवरायांच्या आदर्श कारभाराचे धडे विदयार्थ्यांना दिले जाणार..! पुणे विद्यापीठात ‘डिप्लोमा कोर्स’ सुरु
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. त्यांचे जीवन प्रत्येकासाठी एक आदर्श आहे. आपल्या कुशल युद्धनीतीच्या जोरावर त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले.
एक प्रशासक म्हणून गावगाडा कसा हाकावा, याचा आदर्श वस्तुपाठ महाराजांनी दाखवून दिला. त्यामुळे त्यांचे राज्य ‘रयतेचं राज्य’ ठरले. महाराजांनी राबवलेल्या कल्याणकारी योजना, त्यांची अर्थनीती या साऱ्याचा विचार केल्यास आजही अचंबित व्हायला होते.
शिवाजी महाराजांची 50 वर्षांची कारकिर्द विविध घटनांनी भरलेली आहे. महाराजांची ध्येयधोरणे, राष्ट्र कसे उभारावे, आदर्श धोरणाचे धडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून दिले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाचे नाव आहे, ‘छत्रपती शिवाजी महाराज : व्हिजन एँड नेशन बिल्डिंग’..!
पुणे विद्यापीठातील संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे हा एक वर्षाचा कोर्स सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
महाराजांची युद्धनीती, एक प्रशासक म्हणून केलेले कार्य, रयतेसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती, याचे धडे आता विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. दोन सहामाही सत्रांत हा अभ्यासक्रम विभागला आहे.
प्रत्येक सत्रात चार विषय, अशा एकूण आठ विषयांत अभ्यासक्रम असेल. प्रत्येक विषयाला चार क्रेडिट आणि शंभर गुण दिले जाणार आहेत. एकूण 32 क्रेडिट आणि 800 गुणांचा हा अभ्यासक्रम असेल.
पहिल्या सत्रात शिकवले जाणारे विषय
- युद्धशास्त्र व युद्धनीती
- नीतीकार
- प्रॅक्टिकल कंपोनंट एँड रिसर्च मेथडॉलॉजी
दुसऱ्या सत्रात शिकविले जाणारे विषय
- शिवाजी महाराजांचे आरमार
- प्रशासन
- फील्ड व्हिजिट एँड प्रोजेक्ट रिपोर्ट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया 14 जूनपासून सुरू झाली असून, चार जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.