पहिले लग्न झालेले असताना गर्लफ्रेंड सोबत राहणे, एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आलं. या तरुणाला गर्लफ्रेंडसोबतही लग्नाची गाठ बांधावी लागली.
दोन्ही बायकांनी लगेच या उद्योगी पतीची वाटणी करून टाकली. त्यानुसार आठवड्यातील तीन दिवस पहिलीसोबत, तीन दिवस दुसरीसोबत आणि एक दिवस आई-वडिलांसोबत आता या तरुणाला राहावे लागणार आहे.
उत्तर प्रदेशमधील रामपूरमधील ढोंकपुरी टांडा परिसरात ही घटना घडली. येथील एका तरुणाची दीड वर्षापूर्वी आसाममधील एका मुलीसोबत ‘फेसबुक’वर मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पहिले लग्न झालेले असताना, घरी बायको असताना, हा तरुण चंदीगडमध्ये आपल्या नव्या मैत्रिणीसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागला.
दरम्यानच्या काळात, ही तरुणी गर्भवती झाली, तरी आपला बॉयफ्रेंड ‘शादीशुदा’ असल्याची तिला खबर नव्हती. मैत्रीण गरोदर असल्याचे समजताच, तिला वाऱ्यावर सोडून हा युवक पसार झाला. आपल्या मूळ गावी आला. या काळात तरुणीने बाळाला जन्म दिला.
आपल्या बाळाला त्याचा बाप नि हक्क मिळवून देण्यासाठी ही तरुणी तरुणाच्या शोधात त्याच्या गावात आली. पोलिसांच्या मदतीने बाळाच्या बापापर्यंत पोहोचली असता, तो विवाहित असल्याचे समोर आले. ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
तरुणाच्या घरातही एकच गोंधळ उडाला. अखेर सर्वानी मिळून तोडगा काढला. या युवकाला गर्लफ्रेंडसोबतही लग्न करण्यास सांगण्यात आलं. युवकाच्या पत्नीलाही त्याच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार करावं लागलं. नंतर या युवकानं गर्लफ्रेंडसोबतही सात फेरे घेतले. त्यानंतर लगेच त्याचे दोन्ही पत्नींमध्ये वाटप झालं.
सोमवार, मंगळवार आणि बुधवारी पहिल्या पत्नीसोबत, तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी त्याला दुसऱ्या पत्नीसोबत राहावे लागणार आहे. तसेच, रविवारी त्याला आई-वडिलांना वेळ द्यावा लागणार आहे.