ग्राहकांना शुद्ध सोने (Gold) मिळावे, यासाठी केंद्र सरकारने बुधवारपासून (ता.16) दागिन्यांवर ‘हॉलमार्किंग’ (Hallmarking) असणे बंधनकारक केले आहे. ‘हॉलमार्किंग’ असल्याशिवाय सराफास आता दागिने विकता येणार नाही; तसा प्रयत्न केल्यास मोठा दंड तर भरावा लागेलच, पण जेलवारीही करावी लागू शकते..
पण मग घरातील सोन्याच्या दागिन्यांचे काय, ते विकता येतील का, की त्यांनाही ‘हॉलमार्किंग’ करावे लागेल..? असे जर प्रश्न तुमच्या मनात असतील, तर ही बातमी वाचा..!
‘हॉलमार्किंग’ म्हणजे काय, तर सोने, चांदी, प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण..! हॉलमार्किंग करण्यासाठी देशभरात केंद्र सुरु केली आहेत. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो, अर्थात ‘बीआयएस’ (BIS) यांच्याद्वारे केले जाते. सध्या देशातील 40 टक्के दागिन्यांवर ‘हॉलमार्क’ आहे.
भारतात अंदाजे 4 लाख ज्वेलर्स आहेत. पैकी केवळ 35,879 आस्थापने ‘BIS सर्टिफाइड’ आहेत. गेल्या पाच वर्षांत देशातील हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 25 टक्क्यांनी वाढल्याचा दावा सरकार करतेय.
दागिन्यांवर ‘हॉलमार्क’ बंधनकारक केल्याने घरातील जुन्या दागिन्यांना काहीच किंमत नाही का, असा प्रश्न पडला असेल, तर तसे नाही. केंद्र सरकारने सोन्याच्या जुन्या दागिन्यांवरही ‘हॉलमार्किंग’ करण्याची सोय केली आहे.
कोणत्याही केंद्रावर जाऊन जुन्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करता येईल. हा.. आता त्यासाठी खिशाला थोडी झळ सोसावी लागेल.. बरं.. हॉलमार्किंग नाहीच केले, तर काय होईल..? तर तुम्हाला कमी किंमतीत दागिने विकावे लागतील. मात्र, यापुढे कोणताही दागिना घेण्यापूर्वी त्यावर ‘BIS हॉलमार्क’ आहे का, हे मात्र तपासून घ्या. हा हॉलमार्क असेल, तरच ते सोनं शुद्ध आहे, असं समजावं..!
कसा असेल ‘हॉलमार्क’..?
‘BIS हॉलमार्क’ हा त्रिकोणी आकारात असून, त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगोही त्यावर असेल.