क्रिस्टियानो रोनाल्डो.. पोर्तूगालचा स्टार फुटबाॅलपटू.. आपल्या किकने भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळविणारा खेळाडू. मात्र, त्याच्या एका इशाऱ्याने ‘कोका कोला’ (Coca cola)कंपनीचा बाजार बसला. थोडेथोडके नव्हे, तर 4 बिलियन डॉलर्सचे (भारतीय रुपयांत 29000 कोटी) नुकसान झाले.
जगातील एक फिट खेळाडू म्हणून रोनाल्डो ओळखला जातो. तो कधीही ‘सॉफ्ट ड्रिंक’चे समर्थन करीत नाही. सध्या यूरो कप-2020 सुरू आहे. ‘ग्रुप एफ’मध्ये 15 जून रोजी हंगेरीविरोधात पोर्तूगालचा सामना होणार होता. पहिल्या मॅचच्या आधी सोमवारी (ता.14) रोनाल्डोने ‘प्रेस कॉन्फरन्स’ घेतली.
पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या रोनोल्डोने खुर्चीवर बसण्यापूर्वी समोर टेबलवर ठेवलेल्या ‘कोका कोला’च्या दोन बाटल्या हटवून त्या जागी पाण्याची बाटली ठेवली. यावेळी त्याने ‘साॅप्ट ड्रिंक’ नव्हे, तर पाणी पिण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे, ‘कोका कोला’ने यूरो कप ‘स्पॉन्सर’ केलेला आहे.
रोनोल्डोच्या एका कृतीमुळे ‘कोका कोला’चे शेअर्स (Share) धाडकन कोसळले. सोमवारी यूरोपमध्ये ‘स्टॉक मार्केट’ (Stock Market) उघडले, तेव्हा ‘कोका कोला’च्या एका शेअरची किंमत 56.10 अमेरिकन डॉलर होती. नंतर अर्ध्या तासातच हे शेअर्स 55.22 डॉलरवर आले.
कंपनीची किंमतही 242 बिलियन डॉलरवरून 238 बिलियन डॉलर्सवर आली. तब्ब्ल 4 बिलियन डॉलर, म्हणजेच भारतीय रुपयांनुसार 29323 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले.
दरम्यान, पाचवा यूरो कप खेळणाऱ्या रोनोल्डोने हंगेरीविरुद्धच्या सामन्यात दोन गोल करीत, त्याच्या टीमला 3-0 असा विजय मिळवून दिला.