पैशाचं झाड.. नोटांचा पाऊस पडला.. असं आपण नेहमीच ऐकतो. पण, त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. मात्र, असाच एक प्रकार समोर आलाय..
पैशांचा पाऊस पडून, तलावावर नोटांचा थर साचल्याची वार्ता एका गावात पसरली. कानोकानी झाली.. नोटा लुटण्यासाठी अवघे गाव तलावावर लाेटले. काहींनी तलावात उड्या मारल्या. त्यात कोणी मालामाल झाले, तर कोणाच्या हाताला काहीच लागले नाही.
राजस्थानमधील (Rajasthan) अजमेर जिल्ह्यात हा प्रकार घडला. या भागात आनासागर नावाचा तलाव आहे. या तलावाच्या रामप्रसाद घाटावरून रविवारी (ता.13) कोणीतरी तलावात पैशांनी भरलेली बॅग फेकली. बॅग उघडली नि नोटा पाण्यावर तरंगू लागल्या. सगळ्या तलावावर नोटांचाच थर साचला.
कोणीतरी हा प्रकार पाहिला नि तलावावर नोटांचा पाऊस झाल्याची अफवा गावभर झाली. वाऱ्यासारखी बातमी पसरली. याबाबत माहिती मिळताच, साऱ्या गावाने तलावाकडे धाव घेतली. मागचा-पुढचा विचार न करता काहींनी तलावात उड्या घेतल्या.
काहींच्या हाताला 500 रुपयांच्या, तर काहींच्या हाती 200 रुपयांच्या नोटा (Currency) लागल्या. ते पाहून तलावाच्या सुरक्षा रक्षकांनीही पाण्यात उड्या मारल्या. विशेष म्हणजे, महापालिकेचे कर्मचारी तर थेट बोट घेऊनच आले. लोकांना खुलेआम नोटांची लूट सुरू केली.
दरम्यान, कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. लगेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तलावात उड्या मारुन नोटा लुटणाऱ्यांना पोलिसांनी काठीचा धाक दाखवून पिटाळून लावले. तलावाभोवती कडक पहारा देण्यात आला. दरम्यान, पैशांनी भरलेली बॅग कोणी फेकली, याबाबत पोलिस आता तपास करीत आहेत.