‘इंडिया’ नव्हे, आता ‘भारत’ हेच नाव चालणार..? काय आहे व्हायरल मेसेजमागील सत्य, जाणून घेण्यासाठी वाचा तर खरं..!
भारत, इंडिया, हिंदुस्थान… देश एकच; पण नावे अनेक.. मात्र, आपल्या भारतभूमीला दिली गेलेली अशी अनेक नावे आता चालणार नाही, तर फक्त ‘भारत’ हे एकच नाव असेल.. खुद्द सुप्रीम कोर्टानेच हा आदेश दिल्याचा मेसेज सोशल मीडियातून ‘व्हायरल’ होत आहे. काय आहे या मेसेजमागील सत्य, सुप्रीम कोर्टाने खरंच असा काही आदेश दिला आहे का, चला तर मग याबाबत जाणून घेऊ या..
भारतभूमीला ‘इंडिया’ नव्हे तर, ‘भारत’ या एकाच नावाने ओळखले जाणार असल्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ‘इंडिया’ हे नाव गुलामगिरीचे प्रतीक आहे. इंग्रजांनी भारताला हे नाव दिले. मात्र, आता 15 जून 2021 पासून सगळीकडे आपल्या प्रिय भारतभूमीचे नाव ‘भारत’ या नावानेच ओळखले जाईल.
‘इंडिया’ हे नाव कोणत्याही सरकारी अथवा खासगी व्यवहारात वापरता येणार नाही. भारत देश स्वतंत्र होण्याकरिता ज्यांनी बलिदान दिले, अशा देशप्रेमींचे स्वप्न पूर्ण झाले. हा आनंद त्यांना समर्पित, अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियात ‘व्हायरल’ होत आहे.
भारत स्वतंत्र झाल्यापासून नावाचा हा वाद सुरु होत आहे. यापूर्वीही अनेकांनी ‘भारत’ हेच नाव कायम ठेवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाने असा कोणताही आदेश दिलेला नाही. नाव बदलण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. त्यासाठी सरकारकडे जावे, असे यापूर्वीच्या एका याचिकेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.
भारतीय संविधानातही ‘India that is bharat’ असे म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होणारा मेसेज चुकीचा असून, असा कोणताही आदेश सुप्रीम कोर्टाने दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.