कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी वस्तू चिकटत असल्याचा दावा नाशिकमधील एकाने केला होता. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘मॅग्नेट मॅन’च्या (magnet man) या दाव्याची पोलखोल केली.
नाशिकमधील सिडको परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाने कोरोना लस घेतल्यावर अंगाला लोखंडी धातूच्या वस्तू चिकटत असल्याचे म्हटले होते. त्याचा व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ झाला. याबाबत माहिती मिळाल्यावर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तिची भेट घेतली.
कोरोना लसीकरणानंतर अंगाला लोखंडी वस्तू चिकटत असल्याच्या दाव्याची पोलखोल केली. ‘अंनिस’च्या दाव्यानुसार, कुठल्याही चुंबकत्वीय क्षेत्रामुळे नव्हे, तर शरीराच्या त्वचेवरील दमटपणा व वस्तूच्या बाह्य पृष्ठभागावरील खाचखळग्यांमुळे या वस्तू अंगाला चिकटत आहेत. ही सामान्य बाब आहे.
त्वचेवरील दमटपणा आणि वस्तूच्या बाह्य पृष्ठभागावरील सूक्ष्म खाचखळगे, यात हवेचा पातळ पापुद्रा तयार होतो. हवेचा दाब कमीत कमी झाल्यावर या वस्तू त्वचेला चिकटतात. मात्र, सुरीसारख्या गुळगुळीत सपाट पृष्ठभाग असलेली वस्तू चिकटत नसल्याचे अनुमान कार्यकर्त्यांनी काढले.
लसीकरणाबद्दल अफवा पसरवू नका
लोखंडच नाही, तर प्लास्टिकच्या वस्तूही अंगाला चिटकतात. त्यामुळे कोरोना लसीकरणामुळे चुंबकत्व निर्माण झाल्याचा दावा चुकीचा आहे. आरोग्य विभागानेही वैद्यकीय सत्य समाजासमोर आणावे, लसीकरणाबद्दल कोणीही अफवा पसरवू नये, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, नितीन बागूल यांनी केले आहे.