कोरोनामुळं पंढरीच्या वारीची परंपरा गेल्या वर्षी खंडित झाली. यंदा पायी वारी होईल, असे वाटत होते. मात्र, राज्य सरकारने यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली आहे. यंदाही मानाच्या 10 पालख्यांना एसटीने नेण्याची परवानगी दिली आहे.
पायी वारीला परवानगी देण्याची मागणी वारकऱ्यांनी केली होती. मात्र, कोरोनामुळे यंदाही बसनेच मानाच्या 10 पालखी नेण्याचा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मानाचा 10 पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, तसेच तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना, तर इतर पालख्यांसाठी 50 लोकांनाच परवानगी असेल.
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखीसोबत प्रत्येकी 60 लोकांना बसने जाता येईल. त्यासाठी राज्य सरकार 20 बसेस देणार आहे. पूजेसाठी फक्त 5 जणांना परवानगी असेल. महाद्वार काल्याला परवानगी दिली आहे, तसेच रथोत्सव साध्या पद्धतीने होईल, असे पवार यांनी सांगितले.
दहा मानाच्या पालख्या
- संत निवृत्ती महाराज (त्रंबकेश्वर)
- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
- संत सोपान काका महाराज (सासवड)
- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
- संत तुकाराम महाराज (देहू)
- संत नामदेव महाराज (पंढरपूर)
- संत एकनाथ महाराज (पैठण)
- रुक्मिणी माता (कौडाणेपूर-अमरावती)
- संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर, अहमदनगर)
- संत चांगटेश्वर महाराज (सासवड)
आषाढी एकादशी 20 जुलै रोजी आहे. संत तुकाराम महाराज पालखी 1 जुलैला, तर 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान होणार असल्याची माहिती मिळाली.