कोरोनावर अजून रामबाण उपाय निघाला नसला, तरी अनेक जण वेगवेगळे उपाय सुचवित आहेत. त्यात आता प्रसिद्ध अभिनेत्री, भाजप खासदार हेमा मालिनी यांची भर पडली आहे.
जागतिक पर्यावरण दिन नुकताच साजरा झाला. यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील निवासस्थानी हेमा मालिनी यांनी पर्यावरण दिनानिमित्त हवन आयोजित केले होते. या वेळी त्यांनी कोरोनापासून बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचा दावा केला आहे.
हेमा मालिनी म्हणाल्या, की “भारतात कोरोनाचा प्रवेश झाल्यापासून मी घरात रोज धूप जाळून हवन करते. सकाळ-सायंकाळी अशा दोन्ही वेळेला मी हवन करीत असते. हवन करुन धूप केल्याने घरगुती वाद होत नाहीत. घरातील वातावरण शांत राहते.”
तसेच, धूप बरोबरच गायीचं शुद्ध तूप, कडुलिंबाच्या पानांचे हवन केल्यास घरातील वातावरण शुद्ध होते. या सगळ्या गोष्टींमुळे कोणत्याही रोगाला रोखण्यास मदत होते, म्हणून मी रोज हवन करते, तुम्हीही रोज करा, असे आवाहन हेमा मालिनी यांनी केले आहे. हेमा मालिनी यांच्या दाव्यावर आता सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. महाराष्ट्राची वाटचाल अनलॉकच्या दिशेने सुरु आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण सुरु आहे.