मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज (ता. 6) रायगडावरून आंदोलनाची घोषणा केली. कोल्हापूरमधील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले.
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन झाले. त्यावेळी ते म्हणाले, की “छत्रपती शाहू महाराजांनीच पहिल्यांदा समाजातील वंचित घटकांना आरक्षण दिलं. त्यामुळे त्यांच्याच समाधीस्थळापासून 16 जूनपासून आंदोलन सुरू करणार आहोत.”
“मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आधीचं सरकार आणि आताचे सरकार फक्त एकमेकांकडे बोटं दाखवित आहेत. आरक्षणाचा खेळ करू नका. तुम्ही माझा संयम पाहिला; परंतु पुढे काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल, पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही,” असे संभाजीराजे म्हणाले.
ते म्हणाले, “कोरोनाचं (corona) संकट असल्याने काही करता येत नाही. काही चुकत असेल, तर माफ करा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती (Bhosle Committee) नेमली. तिने अहवाल दिला आहे. शिफारशी केल्यात. मराठा समाजावर अन्याय होणार असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही.”
आज मराठा समाजाची वाईट परिस्थिती आहे. मग, त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? मी राजकारणी नाही, राजकारण करत नाही. माझ्यावर काही जण मध्यंतरी नाराज झाले होते, पण समाजाची दिशाभूल करणं हे आमच्या रक्तात नसल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
संभाजीराजे माझे धाकटे बंधू : उदयनराजे
“संभाजीराजे (Sambhajiraje) माझे धाकटे बंधू असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. गायकवाड समितीच्या अहवालाचं व्यवस्थित वाचन न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला. वेगवेगळ्या जातींना ‘जीआर’ काढून दिलं, तसेच कोणाचेही काढून न घेता, मराठा आरक्षण द्या,” अशी मागणी छत्रपती उदयनराजे यांनी केली.