लग्न समारंभ म्हणजे आनंदाचा सोहळा. दोन जिवांबरोबरच दोन कुटूंबे यानिमित्ताने एकत्र येतात. लग्न सोहळा म्हटलं म्हणजे विधी, चालीरीती, प्रथा-परंपरा आल्याच.
काही ठिकाणी लग्नानंतर शेजाऱ्यांना नवी नवरी दाखविण्याची प्रथा आहे. मात्र, अशाच एका कार्यक्रमात किरकोळ वादातून महिलांमध्ये थेट ‘फ्री-स्टाईल’ (Free style) हाणामारी झाली. अखेर हा वाद पोलिस ठाण्यात गेला.
मध्य प्रदेशमधील (Madhya pradesh) भिंडच्या कछपुरा गावात हा प्रकार घडला. कछपुरा गावात नव्या नवरीचा चेहरा दाखविण्याचा कार्यक्रम होता. सगळं काही सुरळीत चाललं होतं. नवरी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर नाच-गाणी सुरू झाली. सगळे काही आनंदात सुरू होतं. सारे हास्य-विनोदात रमले होते.
अचानक एका महिलेने नवरीच्या रंगावरून कमेंट केली. ‘नवरी तर काळीय बाई..!’ नि झाले, वादाची पहिली ठिणगी पडली.
गावातील दुसऱ्या एका महिलेनं शेजारी उभ्या असलेल्या 17 वर्षीय तरुणीकडं पाहत, ‘गोऱ्या मुली तर पळून जातात.. गोऱ्या रंगाच्या मुलींचे अनेक मुलांसोबत चक्कर चालू असते, त्या कधी त्यांच्या ‘बॉयफ्रेंड’सोबत पळून जातील, याचा काही नेम नाही..,’ असा टोमणा मारला.
गोऱ्या रंगाच्या मुलीने त्यास आक्षेप घेतला. या प्रकारामुळे ती चांगलीच संतापली. रागाच्या भरात घरी निघून गेली. सगळा प्रकार तिने आईला, घरच्यांना सांगितला. नंतर आईच्या सांगण्यावरून बहिणीला घेऊन ही तरुणी संबंधित महिलेच्या घरी गेली, तिच्या सासूकडे तिची तक्रार केली.
सासूकडे तक्रार केल्याने संतापलेल्या महिलेने या तरुणीला बेदम मारहाण केली. तिच्या पोटाला चावा घेतला. त्यामुळे या दोघी बहिणींनी मिळून त्या महिलेलाही बेदम मारहाण केली. एकमेकींचे केस उपटले. मारामारीनंतर दोन्ही बाजूंनी पोलिस ठाण्यामध्ये एकमेकीविरोधात तक्रारी देण्यात आल्या.