ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा आयोजित केली आहे. चांगली कामगिरी करून कोरोनामुक्त होणाऱ्या गावांसाठी राज्य सरकारने बक्षिसे जाहीर केली आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरे कोरोनामुक्त होत असताना, ग्रामीण भागात मात्र कोरोना संसंर्ग वाढल्याचे दिसत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ही बाब लक्षात आणून देताना, गावे ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते.
कोरोनाच्या विळख्यातून गावांची सुटका व्हावी, त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रच कोरोनामुक्त व्हावा, यासाठी सरकार राज्यात ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा घेणार आहे. तशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (ता.2) केली.
अशी मिळणार बक्षिसे..!
‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या प्रत्येक महसूल विभागातील पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख, 25 लाख व 15 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. राज्यातील 6 महसुली विभागांतील प्रत्येकी 3 गावे, यांप्रमाणे राज्यातील एकूण 18 गावांना ही बक्षिसे दिली जातील. त्यासाठी एकूण 5 कोटी 40 लाख रुपये खर्च येणार आहे.
शिवाय ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या प्रत्येक महसूल विभागातील पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठीही दिला जाणार आहे. विविध 22 निकषांवर या गावांचे गुणांकन केले जाणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.