सासू-सूनेतील भांडणे हा नेहमीचाच विषय. किरकोळ कारणांवरुन प्रत्येक घरात कुरबुरी सुरूच असतात. अनेक चित्रपट, मालिकांमध्ये हाच विषय असतो. मात्र, सासू-सुनेतील भांडणाचा एक वेगळाच प्रकार समोर आला.
कोरोनाबाधित सासूपासून फटकून राहणाऱ्या सुनेचा बदला घेण्यासाठी सासूने चक्क सुनेलाच करकचून मिठी मारली. या प्रकारामुळे सूनही कोरोनाबाधित झाली. त्यानंतर लगेच सासूने तिला घराबाहेर काढले..
तेलंगणातील (Telangana) कामारेड्डी येथे हा प्रकार घडला. येथील एका महिलेला काही दिवसांपूर्वी कोरोनाची (corona) लागण झाली होती. त्यामुळे तिला ‘होम क्वारंटाईन’ (Home quarantine) करण्यात आलं. या काळात सुनेनेच तिची सेवा सुश्रुषा केली; पण आपणही कोरोनाबाधित होऊ नये, यासाठी सासुपासून सून ‘फिजिकल डिस्टन्स’ (Physical Distance) पाळत होती आणि हीच बाब सासूला घटकली.
सून आपल्यापासून दोन पावलं दूर राहत असल्याचे तिला सहन झालं नाही. सुनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने तिनं चक्क सुनेसह नातवालाही करकचून मिठी मारली. अखेर सासूची इच्छा पूर्ण झाली. सूनेलाही कोरोनाची बाधा झाली.
आपल्या मनाप्रमाणे घडल्याचे पाहून या महिलेनं कोरोनाबाधित सुनेला घराबाहेर काढलं. सुनेचा नवरा कामानिमित्त ओरिसा येथे राहतो. त्यामुळे तोही तिची मदत करू शकला नाही. अखेर सुनेच्या बहिणीने तिला सहारा दिला. तिला आपल्या घरी घेऊन गेली. तेथेच तिला ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलं. हा प्रकार या सुनेच्या बहिणीनेच उघड केला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.