राज्यातील काही ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली आपण आपल्याच भागात पाहिली असेल. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्नच आपल्याला पडतो. मात्र, सध्या अशी एक गोष्ट खूपच व्हायरल होतेय. कारण लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये एका रस्त्याची नोंद झाली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि त्यांचा रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभाग आपल्या दमदार कामगिरीमुळे ओळखला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा विभागामार्फत सातारा (Satara) जिल्ह्यामध्ये राज्य मार्ग क्र. 147 फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
राज्य मार्ग क्र. 147 वर सलग तब्बल 24 तास काम करुन तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एक लेन (Lane) रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचे कालच काम केले आहे. रविवार, 30 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत सलग 24 तास काम करून या 39.69 किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण केले आहे.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही (Limca Book of Records) नोंद घेतली आहे. 24 तासांत सुमारे 40 किलोमीटरचा एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा हा एक विक्रमच आहे.
अशोक चव्हाणांनी केले कौतुक
सलग 24 तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा हा विक्रम करून कोरोनाच्या या काळामध्ये अनेक अडचणी असताना पूर्ण केला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, कर्मचारी व कामगारांनी केलेली ही कामगिरी नक्कीच आनंददायी, प्रेरणादायी आहे. कर्मचाऱ्यांनी देशात महाराष्ट्राचा मान वाढविला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.