भारतात 5G वर ट्रायल बाकी असतानाच, त्याला पर्यावरणप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आता त्यात आणखी एक दिग्गज नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला.
भारतात यंदा 5G सेवा सुरु होऊ शकते. टेलीकॉम विभागाकडे 5-G ट्रायलसाठी 16 अर्ज आले होते. पैकी सरकारने 13 कंपन्यांना परवानगी दिली आहे. मात्र, यापासून सरकारने हुवावे, ZTE सारख्या चीनी कंपन्यांना दूर ठेवलं आहे.
5G टेक्नोलॉजीची ‘रेडिओ फ्रिक्वेंसी’मुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल, असा दावा करीत पर्यावरणप्रेमींनी त्यास विरोध केला आहे. त्यात जुही चावला हिचाही समावेश आहे. अनेक दिवसांपासून जुही चावला 5जी विरोधात जनजागृती करत आहे.
जुही चावलाने 5 जी टेक्नोलॉजी विरुद्ध थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 2 जून रोजी सुनावणी होणार आहे. 5 जी टेक्नोलॉजीवर योग्य ते संशोधन झालं आहे का? भावी पिढीसाठी ही टेक्नोलाॅजी सुरक्षित आहे का? असा सवाल जुही चावलाने उपस्थित केला आहे. याचिकेवर आज (सोमवारी) होणारी सुनावणी टळली.
5G टेक्नोलॉजीला परवानगी देण्याआधी सर्व गोष्टी बारकाईने तपासून घेतल्या पाहिजे. ज्याद्वारे मनुष्य आणि इतर जीवांवर, तसेच पर्यावरणावर या टेक्नॉलॉजीचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी जुहीची मागणी आहे.
दरम्यान, अमेरिका, चीन आणि दक्षिण कोरियासह श्रीलंका, ओमान, फिलीपींस, न्यूझीलंड सारख्या 68 छो़ट्या देशांमध्येही 5G सेवा सुरु झाली आहे.