मुंबई येथील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. कुणीतरी निनावी फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली. त्याची तातडीने दखल घेत बॉम्बनाशक पथकाने बॉम्बचा शोध सुरू केला आहे.
मुंबईतील मंत्रालयातून राज्याच्या कामाचा गाडा हाकला जातो. दरम्यान, आज (ता.30) दुपारी मंत्रालयातील कंट्रोल रुमला एक फोन आला. फोनवरील अज्ञात व्यक्तीने मंत्रालय परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तातडीने यंत्रणा जागी झाली.
बॉम्बशोधक पथक तातडीने मंत्रालय परिसरात दाखल झाले. मंत्रालयाचा सगळा परिसर या पथकाने अक्षरश: पिंजून काढला. सर्वत्र बॉम्बचा शोध घेण्यात येत होता. खबरदारी म्हणून मंत्रालयाचे सर्व गेट बंद करण्यात आले.
कोरोनाच्या नियामवलीमुळे मंत्रालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी केलेली आहे. तसेच आज (ता.30) रविवार असल्यामुळे मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी होती, अन्यथा एकच गोंधळ उडाला असता. दरम्यान, बॉम्बनाशक पथकाकडून उशिरापर्यंत बाॅम्बचा तपास सुरू होता.
बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचं पथक याठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. तसेच मोठा फौजफाटाही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या आतल्या बाजूला पोलिसांसोबतच बॉम्बशोधक पथक कोणती संशयास्पद वस्तू आहे का, याचा शोध घेत आहे.
तसेच खरंच हा फोन कोणी केला? याचा शोधही मुंबई पोलीस आणि मंत्रालयातील कंट्रोल रुमकडून घेतला जात आहे.