कोरोनामुळे ऐन भरात आलेली ‘आयपीएल’ मध्येच 4 मे रोजी थांबविण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ला घ्यावा लागला होता. त्यानंतर यंदाची स्पर्धा कुठे होणार की रद्द होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. या स्पर्धेसाठी युएई, इंग्लंड आणि श्रीलंका असे तीन प्रस्ताव समोर होते.
‘बीसीसीआय’ची आज (ता.29) मुंबईत महत्वाची बैठक झाली. त्यात हाच विषय मुख्य अजेंड्यावर होता. अखेर ‘आयपीएल’मधील उर्वरित 31 सामने युएईमध्ये (UAE) होणार असल्याचे निश्चित करण्यात आले. ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांना तशी माहिती दिली.
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर विशेष विमानाने इंग्लंड दौऱ्यावर गेलेले खेळाडू थेट युएईमध्ये दाखल होतील. ‘आयपीएल’ला 19 किंवा 20 सप्टेंबर रोजी सुरुवात होऊ शकते. त्यात चार क्वालिफायर, सात डबल हेडर (एकाच दिवशी दोन मॅच) आणि दहा सिंगल हेडर (एका दिवशी एक मॅच) असे स्पर्धेचे स्वरुप असेल. अबूधाबी, दुबई व शारजा येथे हे सामने होणार आहेत.
दरम्यान, कोरोनामुळे परदेशी खेळाडू आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू टी-20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी ‘आयपीएल’मध्ये खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इतर क्रिकेट बोर्डांची काय भूमिका आहे, यावरही बैठकीत चर्चा झाली.
टी-20 विश्वचषकाचं काय?
दरम्यान, यंदाचा टी-20 विश्वचषकही भारतात होणार आहे. मात्र, भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता विश्वचषक स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या स्पर्धेबाबत निर्णय घेण्यासाठी 1 जून रोजी बैठक होणार आहे. विश्वचषक स्पर्धा भारतातच घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील आहे.