कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देताना राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार, याबाबत विद्यार्थी-पालकांच्या मनात संभ्रम होता.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (ता.28) याबाबत माहिती देताना हा संभ्रम दूर केला. त्या म्हणाल्या, “राज्य सरकारचं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य असेल. त्यामुळे अशा काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलाविणे योग्य होणार नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. प्रत्येक विषयनिहाय विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.”
दहावीचा निकाल असा लावला जाणार
- प्रत्येक विषयांसाठी 100 गुणांचे मूल्यमापन होणार आहे. लेखी मूल्यमापनासाठी 30 गुण, गृहपाठ व प्रात्यक्षिकांच्या आधारे 20 गुण आणि नववीच्या परीक्षेतील गुणांच्या आधारे 50 गुण दिले जातील.
- शाळांद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यमापनावर विद्यार्थी खुश नसतील, तर अकरावी प्रवेशासाठी पर्याय म्हणून सामायिक परीक्षा (सीईटी) देता येणार आहे.
- ‘सीईटी’ देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच अकरावी प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित जागांवर अंतर्गत मूल्यमापनाद्वारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.
- विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय निकाल समिती असेल. समितीने जाहीर केलेल्या निकालाची पडताळणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.
- शाळा स्तरावर काहीही गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास, शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
- जूनअखेर निकाल घोषित करण्याचा मानस आहे. मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मंडळाकडून लवकरच वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. शाळांना त्याचं तंतोतंत पालन करावं लागेल.