शिवराज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत (6 जून) मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका न घेतल्यास रायगडावरुन आंदोलनाची सुरुवात करण्याची घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज (ता.28) दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत 6 जूनपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास आम्ही कोविड-बिविड काही बघणार नाही. मराठा आरक्षणाबाबत 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, तेव्हा मी स्वत: सगळ्यांना शांततेचे आवाहन केले होते, नाहीतर महाराष्ट्र पेटला असता. आम्ही किती दिवस शांत बसायचं?”
या आंदोलनात लोकांना वेठीस धरले जाणार नाही. लोकांना रस्त्यावर घेऊन उतरायचे नाही. आता लोकांची ही जबाबदारी नाही, तर 6 तारखेला आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार. आता ही मुख्यमंत्री, आमदार-खासदार, मंत्र्यांची जबाबदारी आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
ते म्हणाले, “मराठा समाजाची गोलमेज परिषद दिल्लीला होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांना मी त्याचे आमंत्रण देणार आहे. मराठा समाजाला तुच्छ लेखू नका.”
मराठा समाजाच्या प्रश्नांवर किमान दोन दिवसांचं अधिवेशन व्हायला हवे. त्यात आरोप-प्रत्यारोप करायचे नसून, समाजाच्या भल्यासाठी काम करा. आम्ही वर गॅलरीत बसून त्यावर लक्ष ठेऊ. नाहीतर सांगून टाका, आम्हाला मराठा समाजाचं मतदानच नको आहे, असे संभाजीराजे म्हणाले.