SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

“उद्धव बेटा, मला मदत कर, इथली परिस्थिती खराब..” उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटलांना शिकवलेल्या शिक्षिकेची आर्त हाक

तौक्ते (Tauktae Cyclone) वादळामुळे राज्यातील किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झालं. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तुफान वारा आणि पावसामुळे अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उडालं असून प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. पुन्हा एकदा नव्याने सर्व काही उभं करण्याचं आवाहन अनेकांसमोर आहेत.

 

यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray, Raj Thackeray, Jayant Patil)  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री जयंत पाटील यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचंही नुकसान झालं आहे. त्या मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय शिकावयचे. सुमन रणदिवे (Suman Randive) या 90 वर्षांच्या आहेत. बालमोहन विद्यामंदिर या शाळेतून 1991 साली निवृत्त झाल्या.
सुमन रणदिवे पतीच्या आणि मुलाच्या निधनानंतर वृद्धाश्रमात आश्रय घेतला. वसईतील सत्पाळा गावातील ‘न्यू लाईफ केअर’ या वृद्धाश्रमात त्या राहत आहेत. या वृद्धाश्रमात 25 हून अधिक वृद्ध राहतात. मात्र वसईतील या वृद्धाश्रमाला तौत्के वादळाचा फटका बसला. आता या वृद्धाश्रमाला मदत मिळावी, अशी मागणी या शिक्षिकेने आपले विद्यार्थी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
या चक्रीवादळामुळे वृद्धाश्रमाचे पत्रे उडाले असून इतरही नुकसान झालं आहे. सर्व सामान, कपडे, कागदपत्रंही भिजली आणि सर्वांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही. यामुळे सुमन रणदिवे यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.
“चक्रीवादळामुळे वृद्धाश्रमाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. छप्पर उडालं असल्याने व आम्ही सगळे वृद्ध असल्यामुळे रात्री झोपायला खूप त्रास होत आहे. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी तुला शिकवलं होतं. इथली परिस्थिती खूप खराब झाली आहे. कृपया आम्हाला मदत कर”, अशी आर्त हाक सुमन रणदिवे यांनी दिली आहे. दरम्यान वृद्धाश्रमाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास आठ ते दहा लाखांचं नुकसान झालं आहे.
Advertisement