SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोना लसीला घाबरून गावकऱ्यांनी घेतल्या नदीत उड्या, पहा कुठे घडलीय ही घटना..?

कोरोनावर (corona) अजून तरी रामबाण उपाय सापडलेला नाही. त्यामुळे या महामारीविरोधात लढण्यासाठी कोरोना लसच महत्त्वाचं शस्त्र आहे. सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, अजूनही लोक लस घेण्यासाठी धजावत नसल्याचे दिसते.

सध्या देशात लसीकरण सुरु असले, तरी मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील लोकांच्या मनात लसीबाबत विविध गैरसमज आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी लस देण्यासाठी एका गावात गेले असता, लसीकरणापासून वाचण्यासाठी गावकऱ्यांनी चक्क नदीत उड्या घेतल्याचे समोर आले आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील सिसौडा गावात ही घटना घडली. 1500 लोकसंख्येचे हे छोटेसे गाव. कोरोना लसीकरणासाठी आरोग्य विभागाची ‘टीम’ या गावात गेली. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरणाबाबत सूचना करताच, गावकरी घाबरले. गावाबाहेरुन वाहणाऱ्या सरयू नदीकाठी जाऊन बसले.

गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी नदीकाठी गेले असता त्यांना पाहून काहींनी तेथून पळ काढला, तर काहींनी आपल्या जीवाची पर्वा न करता, चक्क सरयू नदीत उड्या घेतल्या.

Advertisement

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र गावकरी कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही. 1500 पैकी अखेर 14 लोकांनीच लस घेतली.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement