महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढीचा दर गेल्या काही दिवसात स्थिरावताना दिसत असला तरी देखील, आरोग्य व्यवस्था दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर कोलमडली आहे. याच अनुषंगाने राज्यभर लॉकडाउन सदृश्य निर्बंध लादण्यात आले होते.
हेच निर्बंध 15 तारखेच्या पुढे तसेच राहणार की शिथिल होणार याविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याआधीच दिले होते.
मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय झाला याविषयी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन हा 31 मे पर्यंत तसाच राहू शकतो.
राज्यातील निर्बंध देखील तसेच राहू शकतात अशी शक्यता वर्तवली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लॉकडाउनच्या बाबत सर्व मंत्र्यांचे एकमत झाले आहे.
महाराष्ट्रात निर्बंध लावल्यापासून 7 लाख रुग्णसंख्येवरून आपण 4 लाख 75 हजार पर्यंत आलो आहोत. म्हणजेच लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत आहे असे त्यांनी सांगितले.
अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असून, याबाबत ते लवकरच घोषणा करतील असे देखील त्यांनी सांगितले. लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या मोहिमे बद्दल देखील त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सिरम चे अदार पूनावाला हे नुकतेच भेटले असून महाराष्ट्राला 20 मे नंतर दर महिन्याला दीड कोटी लसीचे डोस देण्याचे त्यांनी कबूल केले आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
ते लंडन वरून परत येतील तेव्हा याबाबतची अधिक माहिती मिळेल आणि लसीचा डोस कसे पोहोचतील याबाबत चर्चा होईल असेही त्यांनी सांगितले. 18 ते 44 या वयोगटातील लसीकरणाला सध्या ब्रेक देण्यात आला आहे.
कारण लसीचे जे डोस महाराष्ट्र सरकारने खरेदी केले आहेत, ते 45 वर्षाच्या पुढील व्यक्तींना दुसरा डोस देण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. सध्या 10 लाख डोस उपलब्ध असून 20 लाख डोसची गरज आहे. कारण, 45 वर्षाच्या पुढील व्यक्तींना डोस देण्यासाठी केंद्राने राज्याकडे केलेला पुरवठा अपुरा आहे.
त्यामुळे वयस्कर व्यक्तींचे लसीकरण आधी पूर्ण व्हावे, असा राज्य सरकारचा मानस आहे. यातूनच 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरण कधी सुरू होईल, हे लसीच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल असेही त्यांनी सांगितले.
45 वर्षे वय असलेल्या किंवा त्याहून जास्त वय असलेल्या नागरिकांच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण होऊ शकते. पहिल्या डोससाठी अजूनही नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे, 4-5 दिवसांनी त्यावर निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.