तो आणि ती. एकमेकांच्या प्रेमात पडले. अगदी आकंठ बुडाले..आता प्रेम म्हटलं, म्हणजे रुसवे-फुगवे आलेच की.. काहीतरी कारणावरून दोघांत वाजले.. कोणताही विचार न करता, तिने तडक पोलीस ठाणे गाठले.. प्रियकराच्या तक्रारीचा पाढाच तिने पोलिसांसमोर वाचला. पोलिसांनी तिचे सारे काही ऐकून घेतले. प्रियकराबाबत ती नाराज असली, तरी मनाच्या गाभाऱ्यात कुठे तरी त्याच्याबद्दल आत्मीयता होती, प्रेम कायम होतं.
पोलिसांनी ही गोष्ट हेरली. समजूत काढल्यावर तिचाही राग शांत झाला. पोलिसांनी तरुणालाही ठाण्यात बोलावून घेतलं. त्याचीही नाराजी काढली. सगळे गिले-शिकवे दूर झाले. हास्यविनोदात बुडाले.. मग वेळ कशाला दवडायचा, असा विचार करीत पोलिसांनी तिथेच त्यांचं लग्न लावून दिलं.. तरुणाच्या हातात पोलिसांची नाही, पण लग्नाची बेडी पडली, ती कायमचीच..!
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी येथे ही घटना घडली. रामगंजमंडी येथील मारुती नगरमधील रहिवासी असलेली 22 वर्षीय युवतीच एका तरुणावर प्रेम होतं. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने वाद होतं होते. सततच्या भांडणाला तरुणी वैतागली, संतापली.. प्रियकराविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली.
पोलिसांनी तिची कहाणी ऐकल्यावर हे ‘प्रेमाचे भांडण’ असल्याची त्यांची खात्री झाली. पोलिसांनी तरुणीची समजूत काढली. कोणतीही तक्रार न घेता, तरुणालाही बोलावून त्याचीही नाराजी दूर केली. त्यांचे संबंध ‘तुटतील इतके ताणले गेले’ नव्हतेच.. एकमेकांबद्दल दोघांनाही प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा वाटत होता.
पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबीयांनी समजावलं. नंतर पोलीस ठाण्याच्या परिसरातील मंदिरातच दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनं दोघांना एकत्र आणलं. दोघांनी एकमेकांसोबत जगण्याचं, आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं. घटनास्थळी उपस्थित असलेला एक पत्रकार पंडित झाला. अवघ्या काही मिनिटांमध्येच दोघेही ‘साता जन्माच्या गाठीत’ बांधले गेले.
ना पाहुण्याची गर्दी, ना मानपान .. ना बॅण्डबाजा, ना सनईचे सूर.. मात्र, पोलिसांनी दोघांना एका सुरात गोवले. एक आगळा-वेगळा विवाह संपन्न झाला. लग्नासाठी दोघांचे कुटुंबीयही उपस्थित होते. पोलीस स्टाफ होता वऱ्हाडी. सगळ्यांनी दोघांनाही ‘नांदा सौख्य भरे..’ म्हणत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. साऱ्यांचे आशीर्वाद घेऊन नवदाम्पत्य सहजीवनाच्या प्रवासाला निघून गेले.