SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मराठा आरक्षण: मराठा समाजाचे ठरले; ‘या’ तारखेपासून पुन्हा काढणार मोर्चा!

मराठा आरक्षणाची धगधगती मशाल पुन्हा एकदा पेटण्याच्या तयारीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे मराठा आरक्षणाविषयीचे सर्व मुद्दे फेटाळून लावत, मराठा आरक्षण देता येण्यासारखी परिस्थिती नसल्याचे स्पष्ट करत आरक्षण नाकारले आहे.

यावरून महाराष्ट्रातील मराठा समाजाची नाराजी महाविकास आघाडी सरकारने ओढवून घेतली आहे. फडणवीसांनी आरक्षण देण्याची केलेली वाच्यता त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या सोबत मालवली की काय? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती सध्या झाली आहे.

Advertisement

सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मराठा आरक्षण ही खूप महत्त्वाची गोष्ट असताना, सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करून अनेक तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले असल्याचे मराठा समाजाकडून बोलण्यात येत आहे.

मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा सुरू होणार असून, बीड जिल्ह्यातून त्याची सुरुवात होणार असल्याची घोषणा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.

Advertisement

मराठा आरक्षणासंबंधित बैठक आज पार पडल्यानंतर विनायक मेटे यांनी हे वक्तव्य केले आहे. कोरोना परिस्थिती जिल्ह्यात आणि राज्यात चिघळत असताना त्यांचे हे वक्तव्य सरकारवर दबाव आणणारे आहे.

त्याचबरोबर जर हा मोर्चा निघाला तर बीड जिल्ह्यामध्ये सध्या वाढत असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या आणखीनच वाढेल की काय?आणि मराठा आरक्षणावरून मुद्दा परत चिघळेल की काय? असे अनेक प्रश्न सामाजिक आणि आरोग्य यंत्रणेच्या पातळीवरदेखील चिंतादायी ठरताहेत.

Advertisement

मराठा आरक्षणाच्या अध्यक्षपदी असलेले नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करत विनायक मेटे यांनी ‘मराठे गप्प बसणार नसून, ते रस्त्यावर उतरतील’ असा इशारा सरकारला दिला आहे.

त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा मोर्चा निघणार असून याचे पडसाद महाराष्ट्रात काय उमटतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

त्याचबरोबर, मराठा आरक्षणासाठी लढणारे औरंगाबाद येथील विनोद पाटील यांनीदेखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर 30 दिवसाच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करता येते. ती आपण करणार असून त्याला नक्कीच न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement