SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘गिरीश पोरींच्या मागे फिरतो..’ खडसेंच्या वक्तव्यावर महाजन संतापले..!

जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. त्यांच्यातील वाद कधीही लपून राहिलेला नाही. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणाऱ्या खडसे यांचे पंख कापण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांना बळ दिले होते.

भाजपमधील घुसमटीला कंटाळून काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला ‘जय श्रीराम’ करीत हातावर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे घड्याळ बांधले. एका पक्षात असतानाही खडसे-महाजन यांच्यात सतत कलगीतुरा रंगलेला असे. खडसे हे ‘राष्ट्रवादी’त गेल्यापासून तर त्यांच्यातील वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत.

Advertisement

जळगावात काही दिवसांपासून एक ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल होत आहे. महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील वडगाव येथील एका तरुणाने खडसे यांना फोन करून पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली. त्यावर खडसे यांनी ‘तुमचा आमदार काय करतो, इकडे-तिकडे बायकांच्या मागे फिरतो का,’ असा सवाल तरूणास केला होता.

तरुणाने ‘ते फोन उचलत नाहीत’ असे सांगितले असता, खडसेंनी ‘तो फक्त पोरींचे फोन उचलतो..’ असा टोला लगावला होता. ही ऑडिओ क्लिप जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या ऑडिओबाबत पुष्टी करण्यासाठी एका पत्रकाराने थेट खडसे यांनाच फोन केला. त्यावर खडसे यांनीही ‘तो आवाज माझाच’ असल्याचे स्पष्ट केले होते.

Advertisement

‘पाण्याची समस्या असताना, आमदार पश्चिम बंगालमध्ये फिरत होते. गेली ३५ दिवस हे आमदार मतदारसंघात नव्हते. लोकांना प्यायला पाणी नाही. महाजन यांच्या मतदारसंघातील लोकांनी गेल्या महिनाभरापासून माझ्याकडे तक्रारी करीत आहेत. प्यायला पाणी नाही, हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत आणि जबाबदारी सोडून आमदारांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला जाणे, कितपत योग्य आहे,’ असा सवाल खडसे यांनी केला.

खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले!

Advertisement

दरम्यान, या ‘ऑडिओ क्लिप’वर महाजन यांनी संताप व्यक्त करताना खडसे यांना चांगलेच फटकारले आहे. ते म्हणाले, की ‘मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेल्या व्यक्तीने एका शाळकरी मुलाशी कसं बोलावं, याचेही भान त्यांना राहिलेले नाही. किमान त्याचा तरी विचार करायला हवा होता. खडसे हे वैफल्यग्रस्त झाले असून, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे मलाच आता लक्ष घालावं लागेल. खडसेंचा इलाज मलाच करावा लागेल..’

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement