कोरोना संकटात अनेक डॉक्टर, नर्स ‘देवदूत’ बनून रुग्णसेवा करीत आहेत. वेळप्रसंगी आपले गाव, शहर सोडून, दुसरीकडे जाऊन हे देवदूत काम करीत आहेत. अशा डाॅक्टर आणि नर्सेस यांच्या प्रवासासाठी एक विमान कंपनी पुढे सरसावली आहे.
‘विस्तारा’ या विमान कंपनीने डॉक्टर आणि नर्ससाठी एक अनोखी ऑफर दिलीय. देशभरातील डॉक्टर, परिचारिकांना मोफत विमान प्रवास देण्याची तयारी या विमान कंपनीने दाखवली असून, तशी घोषणा केली आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी यांना ‘विस्तारा’ कंपनीने पत्र पाठवले आहे. कोरोना संकटात आम्ही या योद्धांची काळजी घेण्यास तयार असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
उषा पाधी यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘विस्तारा’च्या या ऑफरची माहिती दिलीय. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, की ‘सरकारी संस्था आणि रुग्णालयांच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी हवाई वाहतुकीची सुविधा देण्यास ‘विस्तारा’ तयार आहे. शिवाय कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांना मोफत हवाई प्रवासाची सुविधा देण्याचाही प्रस्ताव दिलाय.’
कंपनीने म्हटले आहे, की डॉक्टर, परिचारिकांना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी ये-जा करण्याची सुविधा देऊ शकल्यास आम्हाला आनंदच होईल. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या जागी परत घेऊन जाण्याचीही जबाबदारी घेण्यास तयार आहोत.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
निवेदनात ‘विस्तारा’ कंपनीने म्हटले आहे, जागांची मर्यादीत उपलब्धता लक्षात घेता, जो पहिल्यांदा येईल, त्याला पहिले प्राधान्य दिले जाणार आहे.
‘स्पाईसजेट’ व ‘इंडिगो’कडून सूट
‘स्पाईसजेट’ आणि ‘इंडिगो’ या विमान कंपन्यांनी वेळ किंवा तारीख बदलण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. इंडिगो कंपनी 30 एप्रिलपर्यंत, तर ‘स्पाईसजेट’ कंपनी नव्या बुकिंगसाठी 15 मेपर्यंत चेंज शुल्क घेणार नाही.