SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी असा उभा राहतो हा हॉटेल व्यवसायिक की मोदीही म्हणतात, क्या बात!

शेतकरी आणि त्यांचे प्रश्न हे न संपणारे समीकरण असावे असे कधीकधी वाटते. परिस्थिती कोणतीही असू दे आपल्या देशामध्ये महत्त्वाचा मानला जाणारा शेती व्यवसाय कायम अडचणीत येतो. दुर्दैवाने अनेक शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागते. अपुऱ्या संसाधनापाई, कधी पाऊस आला नाही म्हणून, किंवा कधी बाजार भाव मिळाला नाही, म्हणून शेतकरी कायमच कर्जबाजारी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या कर्जाची परतफेड करण्यासाठी देखील वेगळे कर्ज त्याला घ्यावे लागते. असाच कर्जाचा डोंगर वाढत जाऊन एके दिवशी हा कष्टकरी आत्महत्या देखील करतो.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने कितीही मदत केली तरीदेखील, त्याची कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी आर्थिक मदत समाजातून व्हायला हवी, असे अनेकदा चर्चा होते. मात्र कृती करायला किती जण पुढे येतात? हा देखील मोठा प्रश्न आहे!

Advertisement

अकोला जिल्ह्यातील नागपूर-मुंबई महामार्गावर हॉटेल असणारे एक हॉटेल व्यावसायिक मात्र समाजाच्या मदतीला कायम धावून येतात. या महामार्गावर मराठा नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत हे नेहमीच मानवतेचा दृष्टिकोन ठेवून समाजाची मदत करतात.

नोटाबंदीच्या काळातही पंतप्रधान मोदी यांनी स्वतः त्यांची दखल घेत मन की बात कार्यक्रमांमध्ये ते करत असलेल्या कार्याचा गौरव केला होता. नोटाबंदी झाल्यानंतर प्रवासा दरम्यान निघणाऱ्या लोकांकडे पैसे नसायचे. मात्र, भूक लागल्याने महामार्गावरील हॉटेल जवळ करत जेवण्यासाठी तेथे येत. तेव्हा जेवण करा, पैसे परतीच्या प्रवासात द्या म्हणत हा माणूस माणुसकीचे आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन करत असे.

Advertisement

आता गेल्या 7 वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या लग्नाची जबाबदारी या व्यक्तीने घेतली आहे. गावातील काटे नावाच्या शेतकऱ्याने कर्जाला वैतागून आत्महत्या केल्याने त्याच्या मुलीचे लग्न राऊत यांनी लावले. त्यानंतर हा प्रवास सुरु झाला. आचारी, फोटोग्राफर, मंडप, असे अनेक क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या मदतीला धावून आले आणि आपला खारीचा वाटा आता ते या लग्नात उचलतात. यातून शेतकरी कुटुंबाला 1 रुपयाही खर्च येत नाही.

आतापर्यंत 22 जणांचे असे लग्न त्यांनी लावले आहे. अजून 40 विवाहाची नोंदणी झाली आहे. समाजाचा भाग आहोत असे समजून कर्तव्य करणे हे देखील मोठ्या मनाचे दर्शन आहे. स्वतः एक शेतकरी असल्याने त्यांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरच्या लोकांची जाणीव आहे. याच जाणिवेतून हा प्रवास सुरु आहे! लॉक डाऊन मध्ये हॉटेल व्यवसाय सुद्धा फार तेजीत नाही मात्र तरीही त्यांचे हे कार्य अविरत सुरु आहे याचे विशेष कौतुक वाटते!

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement