SpreadIt News | Digital Newspaper

‘गुगल’चा भारताला मदतीचा हात, १३५ कोटी रुपये देण्याची घोषणा!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला आहे. मागील काही दिवसांपासून देशभरात रोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. जगभरातून भारताकडे मदतीचा ओघ सुरु झालाय. अनेक देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात आणखी एक महत्वपूर्ण नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे गुगल..!

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘गुगल’ने भारतासाठी १३५ कोटी रुपये मदतीची घोषणा केली आहे. ‘गुगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळून येणाऱ्या रुग्णसंख्या वाढत असल्याबद्दलही पिचाई यांनी चिंता व्यक्त केलीय.

Advertisement

ते म्हणाले, की “भारतात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असून, ते पाहून धक्का बसला. ‘गुगल’ आणि ‘गुगल’मधील सर्व जण भारताला १३५ कोटींची मदत करणार आहेत. ‘युनिसेफ’च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था, सर्वाधिक धोका असणाऱ्या समाजातील घटकांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोनासंदर्भातील माहिती पोहचवण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.”

१० देश मदतीसाठी सरसावले!

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात विक्रमी संख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी भारताला मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.

मागील अनेक आठवड्यांपासून भारतात लस निर्मितीसाठी आवश्यक कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणाऱ्या अमेरिकेनेही भारतात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असून, शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन ब्रिटनने भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिलं आहे. जगभरातील दहा देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement