‘प्रोनिंग’ म्हणजे काय? ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने कोरोनाग्रस्तांना दिलेला ‘हा’ सल्ला माहीती आहे का?
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दुसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती रोज बिघडत चालली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. पण ऑक्सिजन तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचा जीव गेला आहे. आपल्याकडे फक्त काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन उरल्याचंही अनेक हॉस्पिटल्सनी म्हटलं होतं, आता हळूहळू ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याची माहीती आहे.
‘प्रोनिंग’ केल्याने कोव्हिड-19च्या रुग्णांना त्यांच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘प्रोनिंग’च्या पद्धती सांगितल्या आहेत. याला आरोग्य मंत्रालयाने ‘प्रोनिंग फॉर सेल्फ केअर’ म्हटलं आहे. जाणून घेऊ…
‘प्रोनिंग’ म्हणजे काय?
शरीरातली ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी योग्य प्रकारे पोटावर आडवं होत दीर्घ श्वास घेण्याच्या प्रक्रियेला प्रोनिंग म्हणतात. असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपल्या जाहीर केलेल्या गाईडलाईन्समध्ये म्हटलं आहे.
घरातच आयसोलेशनमध्ये असणाऱ्या आणि श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या वा ऑक्सिजनची पातळी कमी असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी हे खूप फायद्याचं आहे.
कोरोना रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि शरीरातल्या ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी झाली आहे तर या पद्धतींचा अवलंब करावा, असं या सूचनांमध्ये म्हटलंय.
होम आयसोलेशनमध्ये असताना शरीरातली ऑक्सिजनची पातळी, रक्तदाब, रक्तातली शुगरची पातळी आणि शरीराचं तापमान या गोष्टी ठराविक वेळेने वारंवार मोजाव्यात, असं म्हटलं आहे. ही पद्धत 80 टक्के परिणामकारक असल्याचं या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आलंय.
प्रोनिंग पद्धतीला वैद्यकीय मान्यताही देण्यात आलेली आहे. आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्येही चांगले परिणाम झाले असल्याचं कळतंय. व्हेंटिलेटर न मिळाल्यास ही प्रक्रिया करणं परिणामकारक ठरू शकतं.
कशी आहे पद्धत..?
प्रोनिंगदरम्यान पोटावर झोपण्यास सांगितलं जातं. मानेखाली एक उशी, एक किंवा दोन उशा छातीपासून मांड्यांपर्यंत अंगाखाली घ्याव्यात आणि आणखी दोन उशांवर पाय ठेवावेत, असं सांगण्यात आलंय.
एकूण 4-5 उशा अशा प्रकारे पोटावर झोपण्यासाठी लागतील आणि किती जाड उशा घ्यायच्या हे ती व्यक्ती ठरवू शकते.
दर थोड्या वेळाने आपली पोझिशन कशी बदलावी हे देखील सांगण्यात आलंय. एकाच स्थितीत 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहू नये आणि आपली स्थिती बदलत रहावी.
प्रोनिंग कधी आणि कोणी करू नये?
रुग्ण महिला गर्भवती असल्यास किंवा रुग्ण हृदयविकार असल्यास प्रोनिंग करू नये.
जितक्या वेळ आरामात झोपता येईल, तेवढा वेळच अशा प्रकारे झोपावं, जबरदस्तीने कृती करू नका.
जेवल्यानंतर लगेचच असं पोटावर झोपून प्रोनिंग करू नये.
एकाच प्रकारे झोपल्याने जर अंग दुखू लागलं तर शरीराच्या त्या भागावर येणारा ताण कमी करा आणि तुम्हाला बरं वाटणाऱ्या पद्धतीने झोपा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs