आयुष्यात आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवत असते. त्यातून एक तर आपण माणूस म्हणून घडत जातो किंवा माणूस म्हणून बिघडत जातो.
हे घडणे किंवा बिघडणे प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार त्याच्या हातात असते. काही लोक नकारात्मक परिस्थितीतूनही सकारात्मक शोधायला जातात तर, काही लोक नकारात्मक परिस्थितीतून कोलमडून पडतात.
सध्या कोरोनामुळे देशभरात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. अशा परिस्थितीमध्ये आपली आरोग्य व्यवस्था देखील कोलमडून पडली आहे.
त्याचे विदारक चित्र आपल्याला दिवसेंदिवस बातम्यांमधून आणि सोशल मीडियाद्वारे दिसतच आहे. अशामध्ये सरकारला दोष देत गप्प बसण्यापेक्षा आपण काहीतरी केले पाहिजे. हा विचार एका तरुणाच्या मनात आला आणि हा विचार येण्यामागे कारण होते आपल्या जवळच्या मित्राच्या बहिणीच्या मृत्यूचे!
शहनवाझ शेख या मुंबईतील तरुणाच्या मित्राची बहीण कोरोना काळात ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध झाला नाही म्हणून या जगातून गेली. या घटनेचा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. त्याने आपल्याच्याने जितक्या लोकांना मदत करणे होईल ती करायची ठरवले.
ऑक्सिजन पुरवणे तेही जो मदत मागेल त्याला, यामुळे भांडवल उभे कसे करणार हा प्रश्न होताच. त्याने काहीही विचार न करता स्वतःची कार विकली. 60 ऑक्सिजन सिलेंडर त्यातून उभे करता आले. 40 सिलेंडर त्याने भाडे तत्वावर घेतले.
कोविड केअर सेंटर मध्ये कुठे बेड उपलब्ध आहेत, कोणत्या दवाखान्यात जास्त चांगली सोय आहे, या सगळ्या गोष्टींबाबत त्याने एक वॉर रूम सुरू करून माहिती देण्यासाठी तत्पर सेवा उपलब्ध केली.
आता मुंबई मधील लोक त्याला ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखतात. आशेने त्याच्याकडे मदतीसाठी येतात आणि तोही जमेल ती सगळी मदत करतो. या नकारात्मक वातावरणात सकारात्मक कामे करणारा कोणताही माणूस देवदूतच आहे आणि अशा लोकांची आपल्याला आवश्यकता आहे!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs