कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, फुफ्फुसाचे कार्य व्यवस्थित चालणे महत्वाचे आहे. दररोज सहा मिनिटे ‘वॉक टेस्ट’ (चालण्याचा व्यायाम) करून आपणाला फुफ्फुसाचे आरोग्य, तसेच आपली ऑक्सिजन पातळी लगेच समजू शकते. अगदी घरातल्या घरात आपण ही टेस्ट करू शकतो.
कोरोनाचा कहर सुरु असताना आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपणाला घरच्या घरीच आपल्या फुफ्फुसाचे आरोग्य तपासता येणार आहे. त्यासाठी आपल्याला फक्त सहा मिनिटे चालायचे आहे.
सहा मिनिटाच्या चाचणीने आपणास रक्तातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात येईल. त्यामुळे आरोग्य पूर्णतः बिघडण्याआधीच आपणाला दवाखान्यात दाखल होता येईल. कोरोनाची कोणतेही लक्षणे दिसत नसली तरी, प्रत्येकाने ही टेस्ट करणे आवश्यक आहे.
कोणी करायची टेस्ट?
ताप, सर्दी, खोकला किंवा कोरोनाची लक्षणे जाणवणारी व्यक्ती, तसेच होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या लोकांनी ही टेस्ट करावी.
कुठे करणार टेस्ट?
– ही चाचणी कुठल्याही कडक जमिनीवर वा पृष्टभागावरच करावी.
– जेथे चालणार आहेत, तेथे चढ-उतार नसावा.
– घरातील कडक फारशी कधीही उत्तम
– चालण्यासाठी जास्तीत जास्त रिकामी जागा असावी.
कशी करणार चाचणी?
ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यानंतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेऊन सहा मिनिटे घरातल्या घरातच चालावे. (पायऱ्यांवर चालू नये). अति वेगात किंवा फार हळू न चालत मध्यम चालावे. असे सहा मिनिटे चालल्यावर पुन्हा ऑक्सिजनची पातळी तपासावी. सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनची पातळी कमी झाली नसेल, तर प्रकृती उत्तम समजावी.
समजा, सहा मिनिटे चालल्यावर तुमची ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी झाली असेल, किंवा चालणे सुरु करण्यापूर्वी असलेल्या पातळीपेक्षा ३ टक्क्यापेक्षा घटले असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना बसल्याजागी धाप वा दम लागत असेल, तर त्यांनी ही टेस्ट करू नये. ६० वर्षावरील व्यक्ती ३ मिनिटे चालूनही ही टेस्ट करू शकतात.