SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बड्डे सेलिब्रेशन’ अंगलट, सेल्फी काढताना सहा जण धरणात बुडाले!

नाशिक : ‘बड्डे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा..’ असे म्हणत आपला वाढदिवस एकदम हटके पद्धतीने साजरा करण्याची एक वेगळी ‘क्रेझ’ सध्याचा तरुणाईमध्ये आहे. प्रत्येक जण आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करुन आयुष्यातील तो क्षण अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हा प्रयत्न कधीकधी अंगावरही येऊ शकतो. त्यात कुणाचा जीवही जाऊ शकतो, याचा विचार तरुण करीत नाहीत.

अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली. वाढदिवस साजरा करण्यासाठी धरणावर गेलेल्या नाशिकमधील पाथर्डी येथील पाच मुली आणि एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे पाथर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

एका मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाथर्डी येथील पाच मुली व एक तरुण वालदेवी धरणावर गेले होते. सगळे जण हसत- खेळत होते. आपल्याच नादात धुंद झाले होते. जगाचा त्यांना विसर पडला होता. या परिसरात त्यांनी वाढदिवसाचा केक कापला, जोरदार सेलिब्रेशन केलं.

अशातच कोणाच्या तरी डोक्यात धरणावर मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याची आयडिया आली. वालदेवी धरणाच्या कडेला पाण्याजवळ मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी काही मुली उभ्या राहिल्या आणि घात झाला. कुणाचा तरी अचानक पाय सटकला आणि पाण्यात तोल गेला.

Advertisement

एकापाठोपाठ एक त्या धरणातील पाण्यात पडल्या आणि बुडाल्या. त्यांना वाचवण्यासाठी इतरांनी प्रयत्न केला. त्या प्रयत्नात मुलगाही पाण्यात बुडाला.

मृतांमध्ये 5 मुली, तर एका मुलाचा समावेश आहे. सध्या ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने पाण्यात त्यांचा शोध सुरु आहे. सर्व मृत तरुण हे शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी होते. ते नाशिकच्या पाथर्डी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या ग्रुपमधील एका मुलीचा आज वाढदिवस होता. आतापर्यंत एका मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आलं होते.

Advertisement

काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करण्याआधी मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांचा विचार करणे गरजेचे आहे. अशी एखादी दुर्घटना झाल्यावर आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या त्या आई-वडिलांची अवस्था कशी होत असेल, हे शब्दांत सांगता येणार नाही.

आई-वडील आणि कुटुंबाचाही विचार करावा
मुलांना जन्मापासून लहानाचं मोठं करणं, त्यांना काय हवं नको ते बघणं, त्यांचे लाड पुरवणं, त्यांना शिक्षण देऊन नोकरीला लावणं आणि अचानक मुलांनी अशी ‘एक्झिट’ घेतली, तर हे कधीही त्यांच्या पचनी पडणार नाही. ही जखम कधीच भरुन न येणारी असते. अनेकांचे आई-वडील पूर्णपणे खचतात. काही आजारी पडतात आणि त्याच दु:खात जग सोडतात. त्यामुळे कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी मुलांनी आई-वडील आणि कुटुंबाचाही विचार करावा.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement