देशात सध्या कोरोनाचा महाविस्फोट झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या आकड्यांचे रोज नवनवे विक्रम समोर येत आहेत. मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या लाटेपेक्षा ही लाट भयंकर आहे. विनाशी आहे. उध्वस्त करणारी आहे..
कोरोनाने देशभरातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांचे रोजगार गेले. उद्योग-धंदे बंद पडले. काही तर थेट रस्त्यावर आले. मात्र, घाबरू नका.. हीही वेळ जाईल.. पुन्हा सगळं सुरळीत होईल.. आबादीआबाद होईल..हे आम्ही नाही तर ‘क्रेडिट सुसे’च्या अहवाल म्हणतोय..
जितक्या वेगाने कोरोना रुग्ण आढळत आहेत, तितक्याच वेगाने तो आपल्या देशातून काढता पाय घेईल. या महिन्याच्या (एप्रिल) अखेरीस देशातील ४० टक्के नागरिकांच्या शरीरात ‘अँटी बॉडीज’ (प्रतिपिंड) तयार होतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, असा दावा या अहवालात केला आहे..
संशोधन अहवालात म्हटले आहे, की देशातील २१ टक्के लोकांमध्ये डिसेंबरमध्येच ‘अँटी बॉडीज’ तयार झाल्या आहेत. त्यात या महिनाअखेरीस आणखी ७ टक्के भर पडेल. कोरोना लसीकरणामुळे एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीत वाढ होईल..
एप्रिलअखेर देशातील ४० टक्के लोकसंख्येस कोरोनाचा धोका कमी झालेला असेल. एप्रिलअखेर देशातील १३ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. भारतातील लसीकरणाचा वेग पाहता, २८ टक्के लोकसंख्येत कोरोनाविरोधात लढण्याची प्रतिकार शक्ती तयार होण्यास मदत होईल, असे निरीक्षण या संशोधन अहवालात नमूद केले आहे..
‘लॅन्सेट’चा अहवाल विरोधाभासी!
दरम्यान, लॅन्सेट कोविड आयोगाच्या अहवालानुसार, भारतात वेगाने कोरोनाची लाट पसरत आहे. सरकार व नागरिकांनी योग्य काळजी न घेतल्यास जूनमध्ये देशात रोज १७५० ते २३२० लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागेल.. महाराष्ट्र. छत्तीसगड, कर्नाटक, दिल्ली, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात येथे सर्वाधिक रुग्ण असतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.