सध्या कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. अवघ्या काही सेकंदात हा संसर्ग एकापासून दुसऱ्याला होतो आहे. कोरोना रुग्णाची प्रकृती गंभीर असेल, तर रुग्णाला रुग्णालयात दाखल करणेच चांगले. मात्र, कोरोनाची लक्षणे सौम्य असतील, रुग्णाची प्रकृती व्यवस्थित असेल, तर दवाखान्यात जाण्याची गरज नाही.
होम आयसोलेशन (घरी) राहूनही उपचार केले जाऊ शकतात. मात्र, रुग्णाला काहीही त्रास होत नसला, तरी काळजी घेणे आवश्यक आहे. घरी राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांनी, घरातील सदस्यांनी नेमकी काय काळजी घावी, याबाबत जाणून घेऊ या..
काय काळजी घ्याल?
कोरोना रूग्णाला स्वतंत्र, हवेशीर खोली असावी. रुग्णासाठी स्वतंत्र शौचालय असावे. २४ तास रुग्णाच्या काळजीसाठी एखादी व्यक्ती असावी.
ताप, श्वास घेण्यात अडचण, छातीत सतत वेदना किंवा दबाव, मानसिक गोंधळ, ओठ किंवा चेहरा निळा झाल्यासारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना सांगा.
खोलीच्या खिडक्या खुल्या ठेवाव्यात. रुग्णाने संपूर्ण वेळ थ्री-लेयर मास्क घालावा. दर 6-8 तासांनी तो बदलला पाहिजे. हात साबण आणि पाण्याने किमान 40 सेकंद धुवावेत. रुग्णाचा अधिक स्पर्श झालेल्या पृष्ठभागास थेट स्पर्श करणे टाळावे. रुग्णाची भांडी, टॉवेल्स, शीटचे कपडे पूर्णपणे वेगळे ठेवावेत.
आहार कसा असावा?
रूग्णांनी घरी बनवलेले ताजे, साधे भोजन खावे. मोसंबी, संत्री सारखी ताजी फळे, सोयाबीन-डाळीसारखा प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. अन्नात आले, लसूण आणि हळद, यासारखे मसाले वापरावे. दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्यावे.
कोरोना विषाणू शरीर, तसेच रुग्णांनाही कमकुवत करतो. उपचारादरम्यान रुग्णांनी मानसिक आरोग्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. आपण घरात एकांतात असतानाही मित्र, नातेवाईकांशी फोन व्हिडीओ कॉलद्वारे संपर्कात राहू शकता. आवडती पुस्तके वाचा. मोबाईलवर आवडते शो पाहू शकता. हलके-फुलके गेम खेळू शकता. स्वत:वर जास्त दबाव आणू नये आणि भरपूर विश्रांती घेता येईल, याची काळजी घ्या.
काय खाऊ नये?
कोरोना रुग्णांनी मैदा, तळलेले अन्न किंवा जंक फूड खाऊ नये. चिप्स, पॅकेट बंद रस, कोल्ड्रिंक्स, चीज, लोणी, मटण, तळलेले पदार्थ, मांस आणि पाम तेलासारख्या असंतृप्त चरबीपासून बनवलेल्या पदार्थांपासून दूर रहावे. आठवड्यातून एकदाच अंड्यातील पिवळा भाग खावा. आठवड्यातून दोन किंवा तीन पेक्षा अधीक वेळा नॉन-वेज खाऊ नका.
रुग्णांनी दिवसातून दोनदा ताप आणि ऑक्सिजनची पातळी तपासली पाहिजे. शरीराचे तापमान 100 फॅरेनहाइटपेक्षा जास्त नसावे. ऑक्सिमीटरमधून ऑक्सिजनची पातळी तपासा. SPO2 दर 94 टक्क्यांपेक्षा कमी नसावा. इतर आजार असल्यास, त्याचा उपचार नियमित सुरू ठेवावा. मद्यपान, धूम्रपान किंवा इतर कोणतेही मादक पदार्थ घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याचे अनुसरण करा, नियमित औषधे घ्या
कमी चरबीयुक्त दूध आणि दही खावे. मांसाहार करणार्यांनी स्कीनलेस चिकन, मासे आणि अंड्याचा पांढरा भाग खावा. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. कोरोना रुग्णांचे भोजन कमी कोलेस्टेरॉल तेलात शिजवावे.
किती काळ राहावे होम आयसोलेशन?
सामान्यत: होम आयसोलेशनचा कालावधी 14 दिवस असतो. मात्र, 10 दिवसात रुग्णाला ताप किंवा इतर काही लक्षणे नसतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने बाहेर पडू शकता.
रुग्णाची काळजी घेताना नेहमीच थ्री लेयर मास्क, डिस्पोजेबल ग्लोव्हज, प्लास्टिकचे एप्रन वापरा. सोडियम हायपोक्लोराईटसह नेहमी एप्रन स्वच्छ करा. हात न धुता आपले नाक, तोंड आणि चेहरा यांना स्पर्श करू नका.
शौचालयात जाण्यापूर्वी आणि स्वयंपाक करण्यापूर्वी, नंतर आपले हात नीट धुवा. रुग्णाची थुंकी, लाळ आणि शिंकण्याशी थेट संपर्क टाळा. रुग्ण वापरत असलेल्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू नका. अन्न देताना रुग्णाच्या थेट संपर्कात येऊ नका. अन्न स्टूल किंवा टेबलवर ठेवा. भांडी घासत असताना डिस्पोजेबल हातमोजे वापरा. घरात कोरोना रुग्णाची शारीरिकदृष्ट्या निरोगी असणारी कोणीही 24 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती काळजी घेऊ शकेल.
दररोज रुग्णाची खोली, स्नानगृह आणि शौचालयाचा पृष्ठभाग स्वच्छ करा. आपल्या मोबाईल फोनवर आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड करा आणि अॅपवर 24 तास सूचना आणि लोकेशन ट्रॅकिंग, जीपीएस ट्रॅकिंग सुरु ठेवा.