मुंबई : सगळ्या उपाययोजना सुरु असतानाही कोरोना काही केल्या आटोक्यात येताना दिसत नाही. उलट तो दुप्पट वेगाने मानवावर अटॅक करीत आहे. कोरोना रुग्णसंख्या इतकी झपाट्याने कशी वाढत आहे, याची माहिती चकीत करणारी आहे.
देशभर सध्या कोरोनाचा विस्फोट झाला आहे. महाराष्ट्रात तर रोज कोरोनाबाधित रुग्णसंख्येचे नवनवे विक्रम होत आहेत. कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहून राज्य सरकारने महाराष्ट्रात 1 मेपर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू झाले असून त्याची अंमलबजावणी सुरु आहे.
सध्याचा कोरोनाचा स्ट्रेन इतका शक्तीशाली आहे, की तुम्ही कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आला, तर त्यानंतर अवघ्या 60 सेकंदात, म्हणजेच एका मिनिटात तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. त्यातूनच पूर्ण कुटुंबच्या कुटुंब बाधीत होत आहेत.
एनबीटीच्या रिपोर्टनुसार, दिल्लीतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मते सध्याचा कोरोना व्हायरस प्रचंड वेगाने, ताकदीने पसरत आहे. रुग्णाच्या संपर्कात येताच केवळ एका मिनिटात तो दुसऱ्याला बाधित करीत आहे.
मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या लाटेपेक्षा यंदाची लाट अत्यंत धोकादायक आहे. शक्तीशाली आहे. मागील वर्षी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर संसर्ग होण्यास किमान 10 मिनिटे लागत. मात्र, यंदा हा अवधी अवघ्या एका मिनिटावर आला आहे.
विशेष म्हणजे, 30 ते 40 वयोगटातील तरुणांना सर्वाधिक कोरोना संसर्ग होत आहे. कारण हाच वर्ग सर्वाधिक काळ घराबाहेर असतो. सतत माणसात वावरत असतो.
असा होतो त्रास!
घरातील एखाद्याला कोरोनाची बाधा झाल्यास संपूर्ण कुटुंबालाच तो कवेत घेतो आहे. कुटुंबच्या कुटुंब कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहेत. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांना श्वास घेण्यात त्रास होत होता. मात्र, आता रुग्णांना उलटी, जुलाबाचाही त्रास होत आहे. काहींच्या त्वचेवर लाल चट्टे उमटत आहेत.
राज्यातील कोरोनाची स्थिती विदारक होत चालली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित (5 स्टार) हॉटेलचा वापर केला जाणार आहे. तसे परिपत्रक मुंबई महापालिकेने जारी केले आहे.