सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द
मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं घेतला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होतो, याकडं राज्यातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाचा अभ्यास करु , असं म्हटलं आहे.
सोन्या-चांदीच्या दरात घसरण
दिल्ली – येथील सराफा बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅमच्या दरात 130 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,093 रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर चांदीचा दर 305 रुपयांनी घसरून 66,040 रुपये प्रतिकिलो राहिला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमती घसरल्यामुळे भारतीय बाजारातही पडझड झाली. यात मोठा फरक झालेला नाही.
देशमुख यांची साडेआठ तास चौकशी
मुंबई – सचिन वाझे यास खंडणी वसूल करण्यास सांगिल्याप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी संपली आहे. सीबीआयने तब्बल साडे आठ तास त्यांची चौकशी केली. अनिल देशमुख आज सकाळी 10 वाजता सीबीआय कार्यालयात पोहोचले. सीबीआयचे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस. यांच्याकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली. सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात तब्बल साडेआठ तास ही चौकशी चालली.
मुख्यमंत्र्यानी पीपीई किट घालून राज्यात फिराव – चंद्रकांत पाटील
पंढरपूर – राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याची कल्पनाच नाही. मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट घालून फिरावं, म्हणजे त्यांना वास्तवाची जाणीव होईल, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांचा प्रचार करण्यासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा सल्ला दिला.
हैदराबादविरुद्ध बंगळुरूची बॅटिंग
चेन्नई – आयपीएलच्या 14व्या मोसमातील सहाव्या सामन्याला सुरुवात झाली. सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमध्ये हा सामना खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांनी आपला सलामीचा सामना खेळला आहे. बंगळुरुने विजयी सुरुवात केली, तर हैदराबादला पराभव स्वीकारावा लागला. बंगळुरूचे दोन फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते.
हिंसेशिवाय भाजपकडे काहीच नाही – राहुल गांधी
मुंबई – द्वेष आणि हिंसेशिवाय भाजपकडे देण्यासारखे काहीच नाही. या गोष्टी पसरवण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये भाजप सोनार बांगलाच्या गोष्टी करत आहे. मात्र, संपूर्ण देशाची वाट लावली आहे, असेही ते म्हणले. पश्चिम बंगाल असे एकमेव राज्य आहे, जिथे नोकऱ्यांसाठी कटमनी द्यावं लागतं असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसवर केला. दार्जिलिंग येथे आयोजित रॅलीत ते बोलत होते.
संचारबंदीच्या घोषणेनंतर भाजीपाला महागला!
पुणे : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच शहराच्या विविध भागात लोकांनी फळभाज्या, पालेभाज्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेत किरकोळ विक्रेत्यांनी दरामध्ये तब्बल 20-30 टक्क्यांनी वाढ केली.
सचिन वाझेंला करायची होती दोघांची हत्या
मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, नवीन माहिती हाती लागल्याचे NIA कडून सांगण्यात आले. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या वाहनप्रकरणी सचिन वाझे याना दोघांची हत्या करुन त्यांना या प्रकरणात गोवण्याची शक्यता होती, असा दावा तपास संस्थेकडून करण्यात आला आहे.