अनिल देशमुख यांना सीबीआयचे समन्स
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप सिंग यांनी केला होता. त्यानंतर आता अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी 14 एप्रिलला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करणार आहे.
गुढीपाड्व्याबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकार संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. एमपीएससी, दहावी- बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान, गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक रस्त्यावर उतरतात. या पार्श्वभुमीवर गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाडवा सण साजरा करावा. पालखी, दिंडी, प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यास बंदी राहील. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने आरोग्य शिबिरे घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘त्या’ची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी?
मुंबई – ‘नोटाबंदी, लॉकडाऊनची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशाला करून दिली. वर्षभरापूर्वी मोदींनी केलेल्या लॉकडाऊनचं भाजप कार्यकर्त्यांनी थाळ्या वाजवून स्वागत केलं होतं. आज कोरोनाची परिस्थिती आधीपेक्षा जास्त गंभीर झाली आहे, याचं भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षानं ठेवायला हवं. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी?,’ असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे.
फडणवीस यांनीही घेतली भर पावसात सभा
पंढरपूर – पोलिसांच्या भरवशावर खंडणी वसूल करणारे हे सरकार आहे. लोकशाहीमध्ये सरकारचा अनाचार, भ्रष्टाचार दाखवून द्यायचा असेल, तर या जुलमी सरकारविरोधात मतदान करण्याचा हक्क तुम्हाला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्यासारखेच देवेंद्र फडणवीस यांनीही भर पावसात सभा घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
राजस्थानचा फिल्डींगचा निर्णय
मुंबई – आयपीएलच्या 14व्या पर्वातील चौथा सामना आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सुरु झाला. राजस्थान संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डींगचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा सलामीवीर मयांक आगरवाल स्वस्तात माघारी परतला होता. दोन्ही संघांसाठी आयपीएलचा शेवटचा हंगाम अतिशय खराब गेला. राजस्थानने यंदा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनवर विश्वास दाखवत त्याला संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.
नागरिकांना दिली जाणार आता रशियाची लस
नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरु आहे. मात्र, काही दिवसांपासून देशातील विविध राज्यात लसीची कमतरता जाणवत आहे. अशा वेळी केंद्र सरकारने रशियाच्या Sputnik-V या कोरोना लसीच्या आत्पकालीन वापराला मंजुरी दिली. त्यामुळे आता भारतात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर ही तिसरी लस उपलब्ध होणार आहे. Sputnik V ही एस्ट्राजेनेका प्रमाणेच 2 डोस असणारी लस आहे. गेमालेया रिसर्च इंन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी अॅन्ड मायक्रोबायोलॉजीने ही लस उपलब्ध केली आहे.
नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक
नगर- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकॉउंट कुणीतरी हॅक केले. याबाबतची माहिती स्वतः डॉ. भोसले यांनीच त्यांच्या अकॉउंटवरून दिली. नवीन अकॉउंटवरून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर
नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाने कहर माजविला आहे. बाधित रूग्णांच्या संख्येमुळे दिल्लीतील हॉस्पिटल फुल झाले आहेत. देशात करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. दररोज लाखो रूग्ण पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. ही संख्या एवढी वाढली आहे की दिल्लीतील मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बेड खाली नाहीत. यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारची झोप उडाली आहे.
लॉकडाऊन नव्हे, प्रभावी उपाय करा – पाटील
मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही. त्यापेक्षा आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा वाढविणे आणि प्रभावी उपाययोजानांवर अधिकाधिक भर द्या, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्हिडीओ क्लिपद्वारे केली आहे. तसेच, यामध्ये स्वयंसेवी संस्थांची देखील मदत घ्यावी, अशी सूचना पाटील यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज उशिरा
नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्ष सुनावणी पुन्हा थांबवली. सर्वोच्च न्यायालयातील 44 कर्मचारी बाधित झाले आहेत. त्यामूळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश एक तास उशीरा कामकाज पाहतील. न्यायालायाचे आवार, कोर्टरूम आणि अन्य ठिकाणी निर्जतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या नियोजित वेळेनंतर एक तास उशीरा कामकाज सुरू करतील, असे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.