SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

राज्यात लॉकडाऊनचा निर्णय उद्या होणार
मुंबई- राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन करायचा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. मात्र, यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी कमीत कमी दोन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला. यावर उद्या (ता. १२ एप्रिल) सकाळी 11 वाजता पुन्हा टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. त्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

शिवाजी विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 15 एप्रिलपासून होणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यांपैकी 1 लाख विद्यार्थी ऑनलाईन, तर 20 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. तसेच 6 ते 12 एप्रिलदरम्यान पुढे ढकललेल्या पेपरचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.

Advertisement

रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी
नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत केंद्र सरकारनं रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, देशात 11 एप्रिलपर्यंत कोरोनाचे 11.08 लाख अॅक्टिव्ह रुग्ण असून, त्यात सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे.

वाझे याच्या सहकाऱ्याला अटक
मुंबई – सध्या एनआयए संस्थेच्या ताब्यात असलेला निलंबीत एपीआय सचिन वाझे याचा पोलिस दलातील सहकारी रियाझ काझी यालाही आज एनआयएने ताब्यात घेतले. वाझे यांच्या गैरकारभारात काझीनेही मदत केली होती, अशी माहिती तपासात उघड झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

नितीश राणाची फटकेबाजी
चेन्नई – आयपीएलच्या 14व्या हंगामातील तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजी करत आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. सलामीचा फलंदाज नितीश राणा जोरदार फटकेबाजी करीत होता.

नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ
छत्तीसगढ – बीजापुर जिल्ह्यात वॉटर फिल्टर प्लांटच्या बांधकामात वापरण्यात येत असलेल्या पाच वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. या वाहनांमध्ये ४ मशीन आणि एका वाहनाचा समावेश आहे. नेमेड पोलीस स्टेशनच्या भागात ही घटना घडली आहे. छत्तीसगढमध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासून नक्षलवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २० पेक्षा अधिक जवान शहीद झाले होते.

Advertisement

नगरमध्ये २४१४ बाधितांची भर
नगर – जिल्ह्यात आज १६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १ हजार ९०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ८७.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत २४१४ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२ हजार ८५८ इतकी झाली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्‍शनसाठी नियंत्रण कक्ष
पुणे – पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्‍शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचीही या इंजेक्शनमुळे मोठी धावपळ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी इंजेक्शनचं वितरण सुरळीत व्हावं, यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणासाठी नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. नियंत्रण कक्षाचे नंबर पुढीलप्रमाणे- 020-26123371 तसेच 1077 . या नंबरवर संपर्क साधून रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असलेल्या रुग्णांना ते तात्काळ उपलब्ध करून दिले जाईल.

Advertisement

💁🏻‍♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement