नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकरेज कंपनीपैकी एक आहे Zerodha. निखिल कामत हे या कंपनीचे सह-संस्थापक आहेत. भारतातील अव्वल श्रीमंत व्यक्तींपैकी एक. २०२० फोर्ब्सच्या यादीत भारतातील १०० श्रीमंतांपैकी ते एक होते. परंतु, आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल, की एके काळी कामत यांनी अगदी कॉल सेंटरमध्येही काम केले आहे. तेही फक्त ८ हजार रुपये महिना पगारावर..!
‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’च्या फेसबुक पेजवर याबाबत माहिती शेअर करण्यात आली आहे. त्यात निखिल यांच्या यशाचा प्रवास कथन करण्यात आलाय.. चला तर मग आज आपण निखिल यांचा हा प्रवास कसा झाला हे जाणून घेऊ या..
शालेय काळापासूनच निखिल यांना नेहमीच्या रट्टा मार अभ्यासात रस नव्हता. त्यातूनच त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी व्यवसाय जगतात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या पोस्टमध्ये निखिल लिहितात, “बाबा बँकेत असल्याने त्यांची बऱ्याचदा बदली झाली. मी ९ वर्षांचा असताना, शेवटी आम्ही बंगळुरू येथे स्थायिक झालो. मला शाळेचा नेहमीच तिटकारा यायचा. आपण अभ्यासाऐवजी दुसरे काही का करू नये, असे वाटायचे, पण याबद्दल कोणी काही सांगत नव्हते.”
शिक्षणाची आवड नसल्याने निखिल यांनी बोर्ड परीक्षेच्या वेळीच वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी शाळेला राम राम केला. वयाच्या 14व्या वर्षी ते वापरलेले फोनची खरेदी-विक्री करू लागले. अर्थात, त्यांच्या या उद्योगाची घरच्यांना माहिती नव्हती. हे काम ते कुटुंबापासून छुप्या पद्धतीने करीत. पण, ही लपवा-छपवी जास्त दिवस चालली नाही. एके दिवशी आईला त्यांच्या व्यवसायाची माहिती मिळालीच. त्यांनी हे काम करण्यास त्यांना विरोध केला. त्यांचा फोन शौचालयात फेकुन दिला.
निखिल यांनी शाळा सोडल्याचे समजताच, पालकांच्या रागाचा पारा चढला. निखिल पोस्टमध्ये लिहितात, की “माझे पालक म्हणाले होते, की असे काहीही करू नका, की ज्यामुळे आपल्याला लाज वाटेल! मी स्मार्ट असल्याचा त्यांना गैरसमज होता. मी गणितात चांगला होता, बुद्धिबळ खेळायचो.”
शाळा सोडल्यावर सुरुवातीच्या दिवसात निखिल यांच्याकडे काहीच कामधंदा नव्हता. अखेर वयाच्या 17व्या वर्षी त्यांना पहिली नोकरी मिळाली. कॉल सेंटरमध्ये ते कामाला लागले. त्यातून त्यांना महिना आठ हजार रुपये पगार मिळायचा. सायंकाळी 4 ते रात्री 1 या वेळेत त्यांना तिथे काम करावे लागायचे. त्याच वेळी ते सकाळी व्यापारातही मदत करीत.
ते म्हणतात, “वयाच्या 18व्या वर्षी मी स्टॉक व्यवस्थित सुरू केला. वडिलांनी मला त्यांच्या बचतीचा काही भाग दिला आणि हे मॅनेज कर, असे सांगितले. मी कॉल सेंटरमधील माझ्या मॅनेजरला मनी मॅनेजमेंटबद्दल सांगितले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि गुंतवणूक केली. नंतर इतर सहकाऱ्यांनीही यात सहभाग घेतला. मला प्रोत्साहन मिळालं. मी संपूर्ण टीमचे पैसे सांभाळत होतो! ”
2010मध्ये सुरू केली Zerodha
कामत म्हणतात, की आपला मोठा भाऊ नितीन कामत यांच्याबरोबर कामत असोसिएट्स सुरू करण्यासाठी नोकरी सोडली. 2010मध्ये त्यांनी Zerodha लाँच केले. अब्जाधीश झालो, तरी मी तसाच आहे. मी अजूनही माणूस आहे, जो दिवसाच्या ८५ % काम करतो आणि असुरक्षिततेसह जगतो.”