कोरोना आता सर्वत्र थैमान घालत आहे. भारतामध्ये दुसरी लाट अगदी मोठ्या प्रमाणात लोकांना बाधित करत आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सदृश्य स्थिती आहे तर काही राज्यांनी लॉकडाऊन लावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्याच मनात आपल्याला कोरोना झाला आहे की नाही याबद्दल शंका आहे.
तुम्ही घरच्या घरी तुम्हाला कोरोना झाला आहे की नाही याची माहिती मिळू शकता. ही बाब तुम्हाला खोटी वाटू शकते. मात्र, आता असे एक ॲप उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने तुमच्या आवाजावरून तुम्ही कोरोनाग्रस्त आहात की नाही याची चाचणी होणार आहे.
व्होकॅलिस चेक असं त्या ॲपचे नाव आहे. ॲपल आयफोन आणि अँड्रॉइड अशा दोन्ही स्मार्टफोनसाठी हे ॲप आहे. व्होकॅलिसहेल्थ या इस्रायली तंत्रज्ञान कंपनीने हे ॲप विकसित केलं आहे.
हे ॲप ओपन करून त्यावर 50 ते 70 हे आकडे मोठ्याने म्हणायचे, त्याचा ऑडिओ युझरच्या फोनवर रेकॉर्ड होतो. ऑडिओ मॅपस्पेक्ट्रोग्राममध्ये रूपांतरित होतो. तो हीट इमेजप्रमाणे दिसतो.
कोविड रुग्णांच्या हीट इमेजेसशी स्पेक्ट्रोग्राम जोडून पाहिला जातो. त्याआधारे ॲप आपला निष्कर्ष दर्शवतं. युझरच्या आवाजातून प्राप्त झालेली माहिती उपलब्ध नमुन्यांशी जोडून पाहण्यासाठी यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे.
या ॲपची चाचणी भारतातही घेतली जात आहे. याच्या अचूकतेचं प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये व्होकॅलिस हेल्थ कंपनीने बृहन्मुंबई महापालिकेच्या सहकार्याने नेस्को कोविड-19 केंद्रावर ‘क्लिनिकलस्टडी’चं आयोजन केलं होतं. त्यात 2 हजार जण सहभागी झाले होते.
इंग्लिश, हिंदी, मराठी आणि गुजराती अशा भाषांत त्यांच्या आवाजांचे नमुने रेकॉर्ड करण्यात आले. त्यातून निघालेल्या निष्कर्षांच्या अचूकतेचं प्रमाण 81.2 टक्के इतके आले असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना चाचणी करण्यासाठी rt-pcr बंधनकारक करण्यात आले आहे. ही चाचणी महागडी असून या ॲपचा वापर व्यवस्थितरित्या करण्यात आला तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती म्हणून याकडे बघता येईल, आणि तोरणाच्या लढाईमध्ये याचा भरपूर प्रमाणात जगभर उपयोग होईल.