मुंबई – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक झाली.
राज्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अशा वेळी येत्या रविवारी (ता. 11 एप्रिल) एमपीएससीची परीक्षा होणार होती. मात्र, सुरुवातीपासूनच या परीक्षेवर अनिश्चितेचे ढग होते. परीक्षा तोंडावर आलेली असतानाही राज्य सरकारकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला काहीही कळविले नव्हते.
राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. शनिवार व रविवारी पूर्ण लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे ११ एप्रिल रोजी ही परिक्षा होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सर्वच स्तरातून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. अखेर राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही परीक्षा पुढे ढकलली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना फोन करून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलणे बाबत चर्चा केली होती. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या दोन्ही गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचं काय?
दरम्यान, आता दहावी-बारावीच्या परीक्षांचं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केल्याचं ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात, की शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा, ही पहिली प्राथमिकता असेल, असं सांगितलं. बोर्डाचे संबंधित अधिकारी आणि तज्ञांशी त्या सविस्तर चर्चा करत आहेत.
विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या भविष्यातील करिअर संकटात येईल, असा कोणताही निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेणार नाहीत. त्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.