मुंबई – आयपीएलच्या १४व्या पर्वाला आजपासून (ता. ९ एप्रिल) सुरूवात होत आहे. आयपीएलमध्ये तब्बल पाच वेळा जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर उद्घाटनीय सामना होत आहे. यंदाची आयपीएल जिंकून मुंबई इंडियन्सला जेतेपदाची हॅटट्रिक साधण्याची संधी आहे. असे झाल्यास हा पराक्रम करणारा तो पहिलाच संघ ठरू शकतो.
दरम्यान, मुंबईच्या या स्वप्नाला आजपासून सुरूवात होत असताना, नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे स्पर्धेपूर्वीच हा संघ काहीसा अडचणीत आला आहे. मराठी एकीकरण समितीनं एक व्हिडीओ पोस्ट करीत मुंबई इंडियन्स संघावर टीका केलीय.. नेमका हा वाद काय आहे.. कशामुळे मुंबई इंडियन्स संघ अडचणीत आलाय..? चला तर मग जाणून घेऊ या..
मुंबई इंडियन्स संघाने २०१९ व २०२० मध्ये अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यावर विजय मिळवून आयपीएलचे जेतेपद आपल्या नावावर केले होते. शिवाय याआधी मुंबई इंडियन्स संघाने २०११, २०१३ व २०१५ मध्येही बाजी मारली.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघाने तीन वेळा, कोलकाता नाइट रायडर्सनं दोन वेळा ही कामगिरी केली आहे.
मुंबई इंडियन्स संघ कशामुळे आला अडचणीत..?
मुंबई इंडियन्स संघाने क्रिकेटप्रेमींना त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, विविध माहिती मिळण्याकरिता व्हाट्स ऍप क्रमांक दिला आहे. मात्र, त्यावर दिलेल्या भाषांच्या पर्यायात मराठीच नाही. मराठी एकीकरण समितीनं त्यावर आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे. मुंबईची भाषा खरे तर मराठीच असायला हवी. पण, येथे हिंदी भाषा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, असे समितीचं म्हणणं आहे.
मुंबई इंडियन्स संघाच्या मुंबईची भाषा हिंदी दाखवण्याच्या कारस्थानाला मराठी एकीकरण समितीचा विरोध ….https://t.co/aYWchbSsnX
Advertisement— मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र Marathi Ekikaran (@ekikaranmarathi) April 7, 2021
मराठी डावलून हिंदी आणि इंग्रजी, अशा दोन्ही भाषा दिल्या आहेत. इतर राज्यातील संघ त्या त्या राज्याच्या भाषेत सेवा देत आहेत, त्या संघाचे गाणेसुद्धा त्यांच्याच भाषेत आहेत. पण, महाराष्ट्रातील मुंबई संघाचे गाणे मराठीत नाही. शिवाय आता तर व्हाट्स अॅपवर संपर्क करण्यासाठी भाषा पर्यायसुद्धा हिंदीच दिला आहे.
मुंबईची भाषा हिंदी आहे, हे नकळत किंवा मुद्दामून ठसवून देण्याचा केलेला प्रकार आहे. याविषयी मराठी एकीकरण समितीने संबंधितांना कळवून विरोध केला आहे. एकंदरीतच या प्रकारामुळे मुंबई इंडियन्स संघ वादात सापडल्याचे दिसत आहे.