अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली
मुंबई : सीबीआय चौकशीविरुद्ध माजी गृहमंत्री अनिल देशमुख व महाराष्ट्र सरकार यांनी दाखल केलेल्या दोन्ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटीच्या खंडणीचे आरोप केले होते. यांसदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने देशमुख यांची सीबीआय चौकशी केली जाणार आहे.
देशमुख मंत्रिमंडळात दिसतील – जयंत पाटील
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. सीबीआयचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर अनिल देशमुख त्यातून निर्दोष सुटतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यानंतर ते पुन्हा राज्य मंत्रिमंडळात काम करताना जनतेला दिसतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यात रेमडेसिव्हरचा तुटवडा
मुंबई – पुण्या-मुंबईसह राज्यात रेमडेसिव्हरचा तुटवडा जाणवत आहे. हे औषध मिळवण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची फरफट होत आहे. सरकारी व पालिका रुग्णालयांनी मे-जूनमध्ये रेमडेसिव्हरची मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडे काही प्रमाणात साठा उपलब्ध आहे. त्या तुलनेत खासगी रुग्णालयात मात्र या औषधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. मार्च महिन्यात अचानक रुग्णसंख्या वाढल्याने रेमडेसिव्हरचा तुटवडा जाणवत आहे.
सचिन तेंडुलकर कोरोनामुक्त
मुंबई – माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने कोरोनावर मात केली. तो रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारांसाठी तो रुग्णालयात दाखल झाला होता. सचिनने घरामध्ये विलगीकरणात राहणार असल्याची माहिती दिली आहे.
बेपत्ता जवानांची सुटका
बस्तर : छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेले जवान राकेश्वरसिंह मनहास यांची नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली. 7 एप्रिल रोजी राकेश्वरसिंह मनहास यांचा एक फोटो समोर आला होता. हा फोटो नक्षलवाद्यांनी जारी केला होता. त्याशिवाय सीआरपीएफचे जवान राकेश्वरसिंह अद्याप जिवंत असल्याचा दावा केला होता.
कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्यालायक नाहीत – संभाजी भिडे
सांगली : ‘कोरोना हा रोगच नाही. तो मानसिक आजार आहे. कोरोनामुळे जी माणसं मरतात, ती जगण्यालायक नाहीत’ असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नसल्याचेही भिडे म्हणाले.
सांगली येथे लॉकडाऊनविरोधात व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला त्यांनी समर्थन दिले. समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. मात्र, शासन हे दु:शासन होता कामा नये. निवळ मूर्खपणा सुरू आहे. शासनाचे घातकी निर्णय आहेत. संसार आणि व्यापारी मातीमोल झाले. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्याना कवडीमोल अक्कल नसल्याचेही ते म्हणाले.
कठोर निर्णय घ्यावेच लागतील – शरद पवार
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. सध्याच्या घडीला राज्यातील आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्स या सर्वांचीच अहोरात्र मेहनत सुरु आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनेही काही कठोर निर्बंध लागू केले आहेत. सध्या राज्यभरातील विविध स्तरांतून करोना रोखण्यासाठी राज्य सरकारच्या ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेला विरोध होत आहे, पण याशिवाय कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काही पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अंबानी बंधूंना सेबीचा दणका
मुंबई – शेअर बाजाराची नियामक संस्था असलेल्या सेबीने (सिक्युरिटिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांना दोन दशक जुन्या प्रकरणात 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात अंबानी बंधूंव्यतिरिक्त इतरही काही व्यक्तींचा समावेश आहे.
हे प्रकरण रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित असून, २००० सालातील आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने अधिग्रहण नियमांचे पालन न केल्यामुळे सेबीने ही कारवाई केली आहे. अंबानी बंधूंव्यतिरिक्त नीता अंबानी, टीना अंबानी, के. डी. अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही दंड केला आहे.
नगरमध्ये कोरोनाचा विस्फोट
नगर – जिल्ह्यात आज (ता. ८ एप्रिल) कोरोनाचा विस्फोट झाला. दिवसभरात नव्या विक्रमी २२३३ बाधितांची भर पडली. जिल्ह्यात आज १३१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९६ हजार ४९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ८८.२० टक्के इतके झाले आहे. सध्या ११ हजार ६३७ रुग्णावर उपचार सुरु आहेत.
विशेष रेल्वे गाड्या रद्द
मुंबई – राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दादर ते शिर्डी, पंढरपूर, नागपूर, कोल्हापूर या विशेष गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ९ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत या विशेष रेल्वेगाड्या बंद असणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाने अधिकृत माहिती जाहीर केली आहे.