मुंबई – गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले होते. महाराष्ट्रात उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. मात्र, आज (ता. ८ एप्रिल) तापमानामध्ये बदल झाल्याचे दिसून आले.
आज काही प्रमाणात तापमान घटले. ढगाळ वातावरण तयार झाले. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी आज आभाळ भरून आले. भारतीय हवामान खात्याने पुढील ४ दिवस राज्यातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याच्या अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात पुढील चार दिवसात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच १२ एप्रिलपर्यंत हवामान कोरडे राहील. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या भागात हा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवारी (ता. ९ एप्रिल) काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच, दक्षिण, मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाट व पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवसांत पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही ठिकाणी शेतात अजूनही गव्हाचे पीक उभे आहे. शिवाय चारापिके, उन्हाळी बाजरी, द्राक्ष बागा व इतर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.