व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही – उद्धव ठाकरे
मुंबई – कोरोनाची लाट थोपवण्यासाठी लॉकडाऊनचे पाऊल उचलले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
राज्यातील विविध व्यापारी संघटनाचे पदाधिकारी, प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी चर्चा केली. ते म्हणाले, “कोरोनाचे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची माझी भूमिका नाही. दुकाने बंद करणे हा हेतू नाही, तर गर्दी टाळणे हा आहे. कुणाच्याही रोजीरोटीवर निर्बंध आणायची इच्छा नव्हती. पण, आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात-आठ हजार होती. ती आता पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे.”
“रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी आहे. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू कोण नि मित्र कोण, याची ओळख होते,” असे ठाकरे म्हणाले.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या हातात हात घालून काम करू. मात्र, निर्बंधामध्ये शिथिलता देण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली.
देशमुख यांच्याविरुद्ध आणखी एक ‘लेटरबॉम्ब’
मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर आता सचिन वाझे यांनीही लेटरबॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे अनिल परब यांच्यासह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुख यांनी २ कोटी रुपये मागितल्याचा आरोप वाझे यांनी पत्रात केला आहे. हे पत्र आता एनआयए कोर्टाला दिलं जाणार आहे.
अनिल परब यांनी आरोप फेटाळले
“दोन मुलींची शपथ घेतो. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन-तीन दिवसांपासून आरडाओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते, म्हणजे हे प्रकरण त्यांना आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता, त्यामुळे तिसरी विकेट काढणार, असं भाजपला आधीच माहिती होतं,” असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
राहुरीत पत्रकाराची हत्या
नगर – राहुरी येथे पत्रकाराचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी (ता. ६) दुपारी बाराच्या सुमारास रोहिदास दातीर हे राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी मारहाण करत त्यांना स्कॉर्पिओ गाडीत बसवले आणि घेऊन गेले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन दातीर यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच रात्री राहुरी कॉलेज रोडला त्यांचा मृतदेह आढळला. दगडाने ठेचून दातीर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता
मुंबई – राज्यातील काही भागांत पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाट होण्याचा अंदाज आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या के. एस. होसळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली, की येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
शरद पवार यांनी घेतला लशीचा दुसरा डोस
पुणे – जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. याआधी त्यांनी १ मार्च रोजी पहिला डोस घेतला होता. पित्ताशयात खडे झाल्याने त्यांच्यावर नुकतीच शस्रक्रिया झाली आहे. सध्या ते घरीच विश्रांती घेत असून, घरीच त्यांना लशीचा दुसरा डोस देण्यात आला.
देवदत्त पडिक्कल संघात परतला
चेन्नई – आरसीबीचा स्टार युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला उर्वरित संघापासून वेगळे करत आयसोलेट करण्यात आले होते. परंतु देवदत्तची नुकतीच एक कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तो पुन्हा एकदा संघात परतला आहे.
साखरनिर्मितीत महाराष्ट्रच अव्वल
मुंबई – देशात सुरू असलेल्या ५०३ साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात मार्चअखेर २७७ लाख टन साखरनिर्मिती केली आहे. त्यात एकट्या महाराष्ट्राचा वाट १०० लाख टनाचा आहे. यंदा साखरनिर्मितीत महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला (९३ लाख टन) मागे टाकले आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा साखर निर्मितीचा आकडा तब्बल ४४ लाख ४३ हजार टन अधिक आहे.
लेखक म्हणून बिकावू आहेस..
मुंबई – ‘जगाला हेवा वाटेल, अशी सेटलमेंट मला करायची आहे’ अशा शीर्षकाखाली लेखक घनश्याम पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करणारा ब्लॉग लिहिला होता. त्यावर पुण्यातील मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही फेसबुक पोस्ट करीत घनश्याम पाटील यांचा समाचार घेतला आहे. “घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू आहेसच; पण माणूस म्हणून नीच आहेस..” अशा शब्दांत रुपाली ठोंबरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
शेतकऱ्याने उभारली शनिवारवाड्याची प्रतिकृती
पुणे – बैलांवरील प्रेमापोटी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान म्हणून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील दिलीप म्हातारबा पवळे या शेतकऱ्याने शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारली आहे. बैलांचं आणि घोडीचं उन्हापासून संरक्षण व्हावं, यासाठी कडब्यापासून मांडव तयार केला आहे. मांडवावर आकर्षक बुरुज, कमान, त्यावर फडकणारा भगवा झेंडा आणि सोबतीला चमचम करणाऱ्या ढाली आणि तलवारी लावल्या आहेत. दर्शनी भागात शिवाजी महाराजांचा पुतळाही उभा केला आहे.