मुंबई – राज्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने शालेय परीक्षा घ्यायच्या कशा, असा तिढा निर्माण झाला होता. अखेर शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षाच न घेण्याचा निर्णय घेतला. या वर्गातील विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रमोट करण्यात येणार आहे.
मात्र, नववीच्या पुढील विद्यार्थ्यांचे काय, हा प्रश्न कायम होता. त्यानंतर आता शिक्षण विभागानं नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, की यंदा नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. परीक्षेविनाच त्यांना सरसकट थेट उत्तीर्ण केले जाणार आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा होणार
दहावी आणि बारावीच्या परीक्षाबाबत बोलताना शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या, की या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. मात्र या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही, याबाबत येत्या एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
विविध माध्यमातून शिक्षण पोचविण्याचा प्रयत्न
दरम्यान, कोरोनामुळे काही दिवसांपासून आपण ऑनलाइन, ऑफलाइन, यु-ट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरु ठेवलं होतं. यंदा पहिली ते चौथीच्या शाळाच सुरु झाल्या नाहीत. तसेच पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु केल्या होत्या. काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या, तर काही ठिकाणी झाल्या नाहीत.
अनेक ठिकाणी शाळांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले नाहीत. पण विविध माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचविण्याचा प्रयत्न केला. याआधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता, असे गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
💁🏻♀️ ब्रेकिंग आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉https://cutt.ly/NewsandJobs