SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कडक निर्बंध की कडक लाॅकडाऊन? रोजगार बुडाला, सामान्यांवर उपासमारीची पुन्हा वेळ, व्यापाऱ्यांनी केला विराेध..

‘ब्रेक द चेन’ नुसार कडक निर्बंध राज्य सरकारकडून लॉकडाऊन लादले गेल्याने याचे तीव्र पडसाद पहिल्याच दिवशी राज्यभरात उमटले. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उगाचच कारवाई नको म्हणून अनेकांनी आपली दुकानं स्वतः बंद ठेवली होती.

आता 25 दिवस लॉकडाऊन म्हणजे छोटे मोठे लहान व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले. कडक निर्बंध पाहता पाहता हा जणू कडक लॉकडाऊनच असल्याचं दिसून येत असल्याचं म्हणणं मांडत, निवेदने देत मुंबई, पुणे, नागपूर येथे छोटे दुकानदार, व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून विरोध सुरू केला आहे.

Advertisement

राज्य सरकारने कोरोनाविषयक सुधारित नियमावली जाहीर करावी व त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांप्रमाणे आठवड्यातील 5 दिवस नियमांचे पालन करून इतर दुकाने काही वेळ उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी केली. यासोबतच राज्यभरात व्यापाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली.

कडक निर्बंधांना कुठे-कुठे विरोध

Advertisement

▪️ अहमदनगरमध्ये राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने विरोध करत निषेध व्यक्त केला आहे. तर सर्व दुकानांना नियमांचे पालन करून उघडे ठेवण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. ‘राज्य सरकार सर्वसामान्यांना भिकेला लावत असल्याचा आरोप करुन, राज्य सरकारने सर्वसामान्यांचा विचार न केल्यास रस्त्यावर येऊन भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा’, रिपाईच्या वतीने देण्यात आला आहे.

▪️ मुंबईत बोरिवली, भेंडी बाजार परिसरातील दुकानदारांनी मंगळवारी जोरदार निदर्शने केली.

Advertisement

▪️ पुण्यात लक्ष्मी रोड, तुळशीबाग परिसरातील दुकानदारही रस्त्यावर उतरले होते. कोरोनामुळे वर्षभरात तीस टक्के व्यापारसुद्धा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भात सुधारित आदेश काढण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती पुणे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय मुनोत आणि उपाध्यक्ष प्रकाश राका यांनी दिली आहे.

▪️ नागपुरात गांधीबाग, जरीपटका भागातील व्यापाऱ्यांनीही उग्र निदर्शने करीत दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली.

Advertisement

▪️ दरम्यान, येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने कडक निर्बंध मागे घेतले नाही तर शुक्रवार, 9 एप्रिलपासून व्यापारी आपली दुकाने सुरू करतील, असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्रामुळे देशाचे 40 हजार कोटींचे नुकसान

Advertisement

यंदा महाराष्ट्रातील जवळपास महिनाभराच्या लॉकडाऊनमुळे देशाला 40 हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा अंदाज केअर रेटिंग्ज या पत मानांकन संस्थेने केला आहे. व्यापार, हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्राला यामुळे सर्वाधिक फटका बसेल. यामुळे देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) मध्येही 10.7 पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात यंदा जीडीपी 11 ते 11.2 टक्के राहील, असा अंदाज आहे.

लॉकडाऊनमुळे तीव्र नाराजी

Advertisement

छोटे दुकानदार, छोटी हॉटेल्स, केशकर्तनालये अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक होते. यामुळे सर्वसामान्यांचा रोजगार बुडणार असल्याने, व्यापारी वर्गाचे हाल होणार असल्याने तीव्र नाराजी पसरली आहे, असे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. अघोषित लाॅकडाऊनला मनसेनेही विरोध केला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/NewsandJobs

Advertisement