अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटाकाने भरलेल्या कार वरून सुरू झालेल्या प्रकरणाला मनसुख हिरेनची हत्या, सचिन वाझेंचे निलंबन आणि एनआयए कडे सोपवलेला तपास यात मोठे खुलासे समोर येत आहेत.
एन आय ए कोठडीत वाढ झाल्यानंतर सचिन वाझे यांनी एन आय ए कडे एक लेटर बॉम्ब टाकून मोठा खुलासा केलेला आहे. यामध्ये केलेला गौप्यस्फोट महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारा आहे.
काय आहे वाझे यांनी एनआयए ला लिहिलेल्या पत्रात?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 2020 मध्ये मला पोलिस दलात घेण्याला विरोध होता. शरद पवारांची माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी इच्छा होती. पण, शरद पवारांचे मतपरिवर्तन आपण करू त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला नागपूरमधून फोनवर सांगितले होते. देशमुख यांनी या कामासाठी माझ्याकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचा दावा वाझे यांनी पत्रात केला आहे.
अनिल देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून शहरातील 1650 रेस्टॉरंट आणि बार कडून पैसे वसूल करायचे सांगितले होते. हे काम आपल्या क्षमते बाहेर आहे असे सांगून ही गोष्ट टाळून नेली आणि नंतर अनिल परब यांनी देखील निवासस्थानी बोलवून एस बी यु टी चे प्रकरण पुन्हा हाती घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. ही चौकशी थांबवावी म्हणून 50 कोटींची मागणी देखील त्यांनी केली असल्याचे या पत्रात सांगितले आहे.
2021 मध्ये मंत्री अनिल परब यांनी देखील शासकीय निवासस्थानी बोलवून बृहन्मुंबई येथील 50 ठेकेदारांकडून प्रत्येकी 2 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले. हे देखील आपल्या क्षमते बाहेर आहे असे सांगून ती गोष्ट मी टाळून नेली, असे सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
याद्वारे आता चौकशीमध्ये पुढे अजून किती गौप्यस्फोट होतात आणि नेमके चौकशीअंती काय बाहेर येते हे पाहणे गरजेचे आहे.