मुंबई – कोरोनाचा कहर वाढू लागल्याने राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी मिनी लॉकडाऊन केले आहे. नागरिकांवर अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने पहिली ते आठवीच्या विध्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता, त्यांना थेट पुढील वर्गात ‘प्रमोट’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, नववीच्या पुढील वर्गाचे काय होणार, दहावी व बारावीच्या परीक्षा होणार का? याबाबत विदयार्थी-पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच बैठक घेतली.
नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या काळात होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटला आहे. मात्र, नववी ते अकरावीच्या परीक्षांचे भिजत घोंगडे कायम होते. मात्र, लवकरच नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या, असा प्रश्न शासनापुढे आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली. त्यास शिक्षण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यात मिनी लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु असताना, शनिवारी आलेल्या पेपरचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता.
नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत उद्या (बुधवार) सायंकाळपर्यंत निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय पाच दिवसांनंतर होणार आहे. पहिली ते आठवीप्रमाणेच दहावी व बारावीच्या विध्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता थेट पास केले जाणार असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनादेखील पुढच्या वर्गात प्रमोट करण्याची मागणी केली होती. त्यामुळे लवकरच हा निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
🎯 इतर महत्वाच्या बातम्या :
3️⃣ घाबरू नका! तुमच्या विरोधात खोटा FIR दाखल झाला तर काय करायचं, वाचा.. 👉 https://cutt.ly/jcU31yR
4️⃣ स्प्रेडइट – दुपारच्या झटपट बातम्या 👉 https://cutt.ly/ZcU8evg