अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. देशमुख यांच्या चौकशीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे. देशमुख यांनी याचिकेत प्रतिवादी म्हणून महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार, परमजीत सिंग आणि सीबीआयचा समावेश केला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट
महाराष्ट्रात आज दिवसभरात ४७,२८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात एकूण बाधितांची संख्या आता ३०,५७,८८५ झाली आहे. राज्यात आज २६,२५२ रुग्ण कोरोनमुक्त झाले. त्यामुळे कोरोनमुक्त रुग्णांची संख्या आता राज्यात २५,४९,०७५ झाली आहे. राज्यात आज दिवसभरात १५५ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ४,५१,३७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात कोरोना लसीकरण जोरात
राज्य सरकारच्या दाव्यानुसार, आतापर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख २१ हजार ३३२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. विशेषतः 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील ४२४३ केंद्रांवर तब्बल ४ लाख ३० हजार ५९२ नागरिकांना लस दिल्याची माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
व्यावसायिकांना दिलासा द्यावा – फडणवीस
‘विकेंड लॉकडाऊन’ला विरोध नाही. मात्र, ३० एप्रिलपर्यंत दुकानेच उघडायची नाहीत, यास आमचा विरोध आहे. त्यामुळे याबाबत तातडीने पावले उचलून छोटे व्यावसायिक, सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
एमपीएससी परीक्षा वेळापत्रकानुसारच
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल केला नसल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
शिवभोजन थाळीचे पार्सल मिळणार
राज्यात सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी पार्सल देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांची तारीख पे तारीख सुरू आहे.
सोने-चांदी पुन्हा महागले
देशात आज पुन्हा सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले. दिल्लीतील सराफ बाजारात आज सोने प्रति तोळा ४५ हजारांच्या पुढे गेले. तसेच चांदीच्या भावातही वाढ झाली. चांदीचा दर आज प्रति किलो ६४ हजार ५८८ रुपयांवर गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या भावात वाढ झाली. मात्र, चांदी स्थिर राहिली.
मोईन अलीवर तस्लिमा नसरीनचे वादग्रस्त ट्विट
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणाऱ्या मोईन अलीने जर्सीवर दारूची जाहिरात करू नये, अशी विनंती चेन्नईच्या टीमला केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. यावर प्रतिक्रिया देताना तस्लीमा नसरीन यांनी वादग्रस्त ट्विट केलं. ‘मोईन अली क्रिकेटमध्ये राहिला नसता, तर त्याने सिरियात जाऊन आयसिसमध्ये प्रवेश केला असता,’ असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कतरीना कैफही कोरोनाबाधित
कतरीना कैफ हिने सोशल मीडियावर आपण कोरोनाग्रस्त असल्याचे जाहीर केले आहे. इन्स्टाग्रामवर कतरिना हिने म्हटले आहे, की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. मी लगेच स्वतःला आयसोलेट केलं असून, आता होम क्वारंटाइन झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सर्व काळजी घेत आहे.
पारनेरमध्ये पत्नीचा खून
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात चारित्र्याच्या संशयावरून गरोदर पत्नीच्या पोटाला दगड बांधून पतीने तिला तलावात फेकून दिले. नंदा जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी आरोपी पती पोपट जाधव यास अटक केली आहे.